विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर नालासोपारा येथे पैसे वाटल्याचा आरोप बविआचे आमदार, उमेदवार क्षितीज ठाकूर यांनी केला आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाने आता लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. तावडे यांच्यासह भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्यावरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याच दरम्यान यावरून अमोल कोल्हे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
"लढून जिंकता येत नाही म्हणून पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा आणि मग बिनबोभाट गुजरातच्या दावणीला बांधायचा... हा कुटील डाव आज नालसोपाऱ्यात उघड झाला, भाजपाचे राष्ट्रीय सचिव रंगेहाथ पकडले गेले!" असं म्हणत भाजपावर निशाणा साधला आहे. तसेच महाराष्ट्राचा स्वाभिमान हा विकला जाणार नाही असंही म्हटलं. अमोल कोल्हे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर याबाबत एक ट्विट केलं आहे.
"नालासोपाऱ्यात उघड झालेला हा प्रकार निश्चितच धक्कादायक आहे. महाराष्ट्र लढून जिंकता येत नाही म्हणून पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा आणि मग बिनबोभाट गुजरातच्या दावणीला बांधायचा... हा भारतीय जनता पक्षाचा कुटील डाव आज नालसोपाऱ्यात उघड झाला आहे. भाजपाचे राष्ट्रीय सचिव अशा पद्धतीने पैसे वाटप करत असताना रंगेहाथ पकडले गेले! मला वाटतं हीच वेळ आहे आता दाखवून द्यायची... महाराष्ट्राचा स्वाभिमान हा विकला जाणार नाही... तो खरेदी करता येत नाही. शिवछत्रपतींचा महाराष्ट्र लढणार आणि जिंकणार!!!" असं अमोल कोल्हे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. हा आपल्याविरुद्धचा कट असून निवडणूक आयोगाने याची निःपक्षपातीपणे चौकशी करावी, असं तावडे यांनी सांगितलं. विनोद तावडे म्हणाले की, मी कार्यकर्त्यांना भेटायला गेलो होतो. मी काहीही चुकीचे केले नाही. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा हा डाव आहे. पोलीस आणि निवडणूक आयोगाने याची चौकशी करावी.