लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 12:40 PM2024-11-06T12:40:15+5:302024-11-06T12:41:02+5:30
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला
Ajit Pawar NCP Manifesto : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांनी सोमवारी विविध आश्वासनं दिलं आहेत. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास आगामी काळात देखील काही योजना राबवल्या जाणार असल्याची माहिती जाहीरनाम्यातून देण्यात आली आहे. तसेच लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला. या जाहीरनाम्यामध्ये १० हमी देण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यास लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्यात येणार असल्याचे सुनील तटकरेंनी सांगितले. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना महिन्याला १५०० वरून २१०० रुपये देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यामध्ये करण्यात आलेलं आहे.
मतदानाचा आशीर्वाद मिळाल्यास या वचनांची निश्चित अंमलबजावणी करु असे सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. "भगिनींना समर्पित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या मासिक रकमेत वाढ करण्याचे आश्वासन आम्ही देत आहोत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या १५०० रुपये देण्यात येत आहे. नोव्हेंबरपर्यंत महिलांच्या खात्यात ७००० रुपये जमा झालेले आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुती विजयी झाल्यास या मासिक रकमेत ६०० रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र महिलांना महिन्याला २१०० रुपये मिळणार आहेत. ही महाराष्ट्राच्या इतिहासातील महिलांसाठी महत्त्वाची योजना ठरणार आहे. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आलं तर २,३०,००००० महिलांना दरवर्षी २५ हजारहून अधिक रक्कम मिळेल. ज्यामुळे महिलांना मोठा आधार मिळणार आहे. महिलांना लाभ देण्याचे आम्ही वचन दिलं आहे. पुन्हा निवडून आल्यास या हमीची पूर्तता करण्याचे आश्वासन आम्ही देत आहोत," असं सुनील तटकरे यांनी म्हटलं.
जाहीरनाम्यात आणखी काय?
लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना २१०० रुपये देण्यात येणार
महिला सुरक्षेसाठी २५ हजार महिलांना पोलिस दलात समावेश करण्यात येणार
धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजर रुपये देण्यात येणार
ग्रामीण भागात ४५००० पाणंद रस्त्यांच्या निर्मिती करण्याचे आश्वासन
शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा आणि शेती पिकांच्या किमान आधारभूत किंमतीवर २० टक्के अनुदान देणार
वीज बिलात ३० टक्के कपात करून सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य देणार
वृद्ध पेन्शन धारकांना आता १५०० ऐवजी महिन्याला २१०० रुपये देण्याचा निर्णय घेणार
दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून महिन्याला दहा हजार रुपये विद्यावेतन देणार
२५ लाख रोजगार निर्मितीचे आश्वासन