Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. आचारसंहिता लागू होताच राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. यातच आता अडचणीच्या काळात अनेकदा मदत करणारे बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूरमहायुतीची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांनी महाविकास आघाडीला साथ देण्याच्या हालचाली सुरू केल्या असून, मविआची साथ बविआला मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
गेल्या २५ वर्षांपासून वसई विरारच्या राजकारणात हितेंद्र ठाकूर यांची एकहाती सत्ता आहे. गेल्या १० वर्षांत हितेंद्र ठाकूर यांनी वेळोवेळी महायुतीला साथ दिली. मात्र, आता हितेंद्र ठाकूर हे महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
१० वर्षांची साथ मग आताच का भाजपाला धडा शिकवायचा निर्धार?
गेल्या काही दिवसांपासून हितेंद्र ठाकूर यांचे आतेभाऊ आणि बविआचे कार्याध्यक्ष राजीव पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. राजीव पाटील यांचा भाजपा प्रवेश जवळपास निश्चित असून ते नालासोपाऱ्यातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. हितेंद्र ठाकूर हे बहुजन विकास आघाडी पक्षाचे सर्वेसर्वा असले तरी राजीव पाटील हे पक्षात दोन नंबरचे नेते म्हणून ओळखले जातात. राजीव पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून नवरात्रोत्सवात भाजप कार्यकर्त्यांच्या मंडळांना भेटी दिल्या होत्या. राजीव पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश होण्याची शक्यता आहे. याच कारणावरून भाजपा आणि पर्यायाने महायुतीला शह देण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांनी नवी खेळी केली आहे. बविआला पाठिंबा दिल्यास हितेंद्र ठाकूर मविआचे तीन उमदेवार निवडून आणू शकतात, अशी चर्चाही सुरू आहे.
नालासोपाऱ्यात रंगणार काका-पुतण्यांची लढत?
हितेंद्र ठाकूर यांचे सुपुत्र क्षितिज ठाकूर तीनवेळा नालासोपाऱ्यातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. राजीव पाटील यांना नालासोपाऱ्यातून लढण्याची इच्छा होती. परंतु, हितेंद्र ठाकूर यांनी मुलाला झुकते माप दिले. आता राजीव पाटील भाजपामध्ये गेल्यास नालासोपाऱ्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरु शकतात. त्यामुळे क्षितिज ठाकूर यांच्यासमोर आव्हान उभे ठाकण्याची शक्यता आहे. राजीव पाटील यांचा स्वत:चा कार्यकर्ता वर्ग आणि समांतर यंत्रणा वसई शहरात कार्यरत आहे. राजीव पाटील यांना महाशक्तीची साथ मिळाल्यास हितेंद्र ठाकूर यांना शह देऊ शकतात, असा दावा केला जात आहे.
दरम्यान, राजीव पाटील यांचे मन वळवण्याचे प्रयत्न बहुजन विकास आघाडीने सोडून दिले आहेत. बहुजन विकास आघाडीच्या कार्यक्रमाच्या फलकांवरून राजीव पाटील यांचे नाव आणि छायाचित्रे वगळण्यात आले आहे. राजीव पाटील यांचा भाजपा प्रवेश आणि महाविकास आघाडीने बविआला पाठिंबा देण्याचा निर्णय केल्यास वसई विरारच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.