मुंबई - राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नाही आणि कुणीही कायमचा मित्र नाही. २०१९ च्या विधानसभा निकालानंतर काय घडणार याचा अंदाज कुणी बांधला होता का, तसेच २०२४ च्या निकालानंतरची परिस्थिती काय असेल सांगता येत नाही. परिस्थितीनुसार काहीही घडू शकते त्यात अजित पवार किंगमेकरच्या भूमिकेत असतील असा दावा आमदार नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे २३ नोव्हेंबरला मतमोजणीनंतर राज्यात २०१९ च्या निकालानंतरची पुनरावृत्ती घडणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.
नवाब मलिक म्हणाले की, २०१९ च्या निकालानंतर काय घडेल याचा अंदाज कुणी बांधला होता का, २०२४ च्या निकालानंतरही काही घडू शकते. अजित पवार किंगमेकर राहतील अशी खात्री आहे. मी जास्त भविष्यवाणी करू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला चांगल्या जागा मिळतील. आताच्या घडीला ही लढाई काटे की टक्कर अशी आहे. मोठा संघर्ष होणार आहे. सरकार कुणाचं येईल असा दावा कुणी करू शकत नाही. प्रचार जसजसा पुढे सरकत जाईल त्या परिस्थितीनुसार पुढे बघू असं त्यांनी सांगितले.
तसेच राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू नसतो. परिस्थिती बदलत राहते. शत्रू मित्र होतात, मित्र शत्रू होतात असंही नवाब मलिकांनी सांगितले. तर माझा दहशतवाद्यांशी संबंध आहे, मी देशद्रोही आहे असं काहीजण म्हणतात. मी आतापर्यंत काही बोललो नाही कारण आमच्यावर निर्बंध होते. पण जो माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला उत्तर देण्याचा मला अधिकार आहे. बोलण्याचा अधिकार जसा असतो, तसा खोट्या आरोपांना उत्तर देण्याचा अधिकारही आहे खोट्या आरोपांनी आम्ही घाबरत नाही. परंतु जे खोटेनाटे आरोप करतात त्यांच्याविरोधात कायदेशीर लढा देऊ असं नवाब मलिकांनी म्हटलं.
दरम्यान, मी ३ वेळा कुर्ल्यातून आमदार होतो, २ वेळा अणुशक्तीनगरमधून आमदार होतो. आता मी तिसऱ्या जागेवरून निवडणूक लढवतोय जो अणुशक्तीनगरच्या बाजूला आहे. मला निवडणूक लढायची नव्हती. मी जेलमधून सुटल्यानंतर माझ्या मुलीने मतदारसंघात काम पाहिले. मी कार्यालयात बसल्यानंतर लोक तिला भेटायला यायचे. त्यामुळे मी निवडणूक लढणार नाही तिला उभं करू हे ठरवले. मात्र मागील ३-४ महिन्यापासून शिवाजीनगर मानखुर्दची लोक मला भेटायला येत होते. मी निवडणूक लढवावी असा लोकांचा आग्रह होता. आज या मतदारसंघात ड्रग्सचा विळखा आहे. गुंडाची दहशत आहे. लोक दहशतीत जगतायेत असं लोक म्हणाले. पण मीच का असा विचारले असता याआधी जे कुणी निवडणूक लढवत होते, त्यांना दहशत दाखवून, खोटे गुन्हे दाखल करून बाजूला सारले जाते. धमक्या आल्यानंतर ते गायब होतात. त्यामुळे तुम्ही कुठेतरी ताकदीने लढाल असा तिथल्या लोकांना विश्वास आहे म्हणून मी या मतदारसंघात निवडणूक लढवत आहे असंही नवाब मलिकांनी सांगितले.