एकीकडे विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच ज्या जागांवर उमेदवार जाहीर होत आहेत. तिथेही पक्षांतर्गत मतभेद उफाळून येताना दिसत आहेत. महाविकास आघाडीमधील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसने तिसरी उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर कोल्हापुरात मोठा राडा झाला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून पक्षाने माजी नगरसेवक राजेश लाटकर यांना उमेदावारी जाहीर केली होती. त्यानंतर नाराज झालेल्या काही अज्ञात कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक केली.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी काँग्रेसकडून अनेक नेते इच्छूक होते. दरम्यान, पक्षाने प्रसिद्ध केलेल्या पहिल्या दोन याद्यांमध्ये येथील उमेदवाराबाबत सस्पेन्स ठेवण्यात आला होता. मात्र तिसऱ्या यादीतून राजेश लाटकर यांचं नाव जाहीर झाल्यानंतर येथून लढण्यासाठी इच्छूक असलेल्या अन्य नेत्यां हिरमोड झाला. दरम्यान, काँग्रेसकडून राजेश लाटकर यांचं नाव जाहीर झाल्यानंतर काही अज्ञातांमी मध्यरात्रीच पक्षाच्या कार्यालयावर धडक देत दगडफेक केली. तसेच कार्यालयावरील काँग्रेसच्या चिन्हाला काळं फासत चव्हाण पॅटर्न असा मजकूर लिहिला.
दरम्यान, या घटनेनंतर काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच दगडफेक करणाऱ्या अज्ञात लोकांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव या विद्यमान आमदार आहेत. २०२२ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपाच्या सत्यजित कदम यांचा पराभव केला होता. दरम्यान, यावेळी काँग्रेसने उमेदवार बदलून राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली आहे.