अमरावती - राहुल गांधी यांच्या भारत जोडो व भारत जोडो न्याय यात्रेमुळे लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले. पण विधानसभेची लढाई सोपी नाही. केंद्रात व राज्यात विरोधकांची सत्ता आहे. धनशक्ती व सत्तेचा गैरवापर करण्यात महायुती कुप्रसिद्ध आहे. त्यामुळे गाफील राहू नका. महाराष्ट्राची निवडणूक देशासाठी महत्वाची असून, राज्यातील सत्ताबदलाचे हादरे दिल्लीलाही बसणार आहेत, असा विश्वास काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे.
विधानसभा निडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अमरावती येथे अमरावती व यवतमाळ जिल्ह्याची बैठक संपन्न झाली, यावेळी व्यासपीठावर, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, उत्तर प्रदेशचे प्रभारी अविनाश पांडे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज बंटी पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. शेतकऱ्यांच्या नावाने योजना काढून त्यातूनही पैसा खाल्ला आहे. महाराष्ट्राला बेरोजगारांचे राज्य बनवले आहे. भाजपा युती सरकारचे विकासाचे मॉडेल हे केवळ दिखावा आहे. विकासाच्या नावाखाली सर्रास लुट सुरु आहे. महाराष्ट्राला वाचविण्यासाठी आता भ्रष्ट सरकारला पायऊतार करावेच लागेल.
विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, लोकसभेत काँग्रेस पक्षाची कामगिरी सुवर्णाक्षरांनी लिहावी अशी झाली आहे आता विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे यश दिमाखदार असले पाहिजे. महायुती सरकार बेकायदेशीर आहे. न्यायालतील निकाल वेळेवर लागला असता तर सरकारचाच निकाला लागला असता. महायुती सरकारच्या भ्रष्टाचारावर विधानसभेत काँग्रेसने आवाज उठवला पण सरकारने उत्तर दिले नाही. आता या सरकारच्या भ्रष्टाचाराची पोलखोल जनतेत जाऊन करू.