अमरावती : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदार संघातील खल्लार येथे युवा स्वाभिमानचे उमेदवार रमेश बुंदीले यांच्या प्रचारार्थ माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रचार सभेचे शनिवारी (दि.१६) आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेत जमलेल्या काही विरोधकांनी अचानक गोंधळ घालायला सुरुवात केली आणि नवनीत राणा यांच्या दिशेने खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
शनिवारी रात्री नवनीत राणा या खल्लार येथे प्रचारसभेसाठी गेल्या होत्या. युवा स्वाभिमानचे उमेदवार अरुण बुंदीले यांचा नवनीत राणा प्रचार करत होत्या. ही प्रचार सभा सुरू झाली. त्यानंतर काही वेळाने नवनीत राणा या सभेला संबोधित करण्यासाठी उठल्या. यावेळी सभेत जमलेल्या काही विरोधकांनी अचानक गोंधळ घालायला सुरुवात केली. तसेच, काहींनी नवनीत राणा यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरू केली. यावेळी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही लोकांनी नवनीत राणांच्या विरोधात घोषणाबाजी सुरूच ठेवली.
दरम्यान, गोंधळ थांबत नसल्याने स्वत: नवनीत राणा या त्यांना समजावण्यासाठी जमावाकडे गेल्या. यावेळी काहींनी नवनीत राणा यांच्या दिशेने खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न केला. यामुळे सभेत एकच खळबळ उडाली. यावेळी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने नवनीत राणा थोडक्यात बचावल्या. यामुळे या हल्ल्यात त्यांचा सुरक्षारक्षक हा किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेनंतर नवनीत राणा यांना त्यांची सभा आटोपती घ्यावी लागली. या घटनेमुळे संपूर्ण अमरावती जिल्ह्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नवनीत राणांचे गंभीर आरोपनवनीत राणा यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. युवा स्वाभिमानचे उमेदवार रमेश बुंदीले यांच्या प्रचारासाठी शनिवारी दर्यापूरच्या खल्लारमध्ये आमची सभा सुरू होती. सभा शांततेत सुरू असतांना मी भाषण सुरु केल्यावर काही लोकांनी गोंधळ घालला. या जमावाने मला अर्वाच्च शब्दांत शिवीगाळ देखील केली. त्यांची समजूत काढण्यासाठी गेले असता, त्यांनी माझ्या अंगावर खुर्च्या फेकल्या. त्यामुळे आरोपींना जर अटक झाली नाही तर अमरावती जिल्ह्यातील सगळा हिंदू समाज या ठिकाणी एकत्र येईल, असे नवनीत राणा म्हणाल्या.
पोलीस ठाण्यात तक्रार दाखलया घटनेनंतर नवनीत राणा यांनी खल्लार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. खल्लार पोलिसांनी ॲट्रॉसिटी ॲक्टसह ४५ ते ५० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यातील चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आला आहे. दरम्यान आरोपींना तातडीने अटक न झाल्यास मोठे आंदोलन करून असा इशारा नवनीत राणा यांनी दिला आहे. या प्रकरणी स्थानिक पोलीस पुढील तपास करत आहे.