Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यावेळी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक मराठा आंदोलनाभोवती फिरताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत मनोज जरंगे पाटील आणि त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम महायुतीने लोकसभेला पाहिले होते. लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे फॅक्टरचा मोठा प्रभाव पडला होता. त्यामुळे आता मराठा आंदोलनाचा हाच परिणाम विधानसभा निवडणुकीतही दिसणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलनुसार महायुतीला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. १० पैकी ६ एक्झिट पोलने महायुतीच्या विजयाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे या निवडणुकीत मराठा आंदोलनाचा फॅक्टर प्रभावी ठरला नसल्याचे समोर आलं आहे.
विविध एक्झिट पोलने महायुतीचे सरकार महाराष्ट्रात पुन्हा येणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तर लोकशाही महारुद्रच्या सर्वेक्षणात राज्यात कोणत्याही एका पक्षाला किंवा आघाडीला पूर्ण बहुमत मिळणार नसून सत्तेची चावी अपक्ष किंवा बंडखोरांच्या हाती असेल, असा अंदाज आहे. प्रत्यक्षात काय होणार हे २३ तारखेला स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे, मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली होती. आपण कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नाही, असे म्हणत मराठा आरक्षणाचा विचार करूनच मतदान करा, असे आवाहन त्यांनी मराठा मतदारांना केले होते.
अॅक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोलनुसार ४८ टक्के मराठा समाज महायुतीच्या पाठीशी असल्याचे समोर आले आहे. तर ४० टक्के मराठा समाजाने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ६४ टक्के ओबीसी समाजानेही महायुतीला पाठिंबा दिला आहे. तर २५ टक्के ओबीसी समाजाने महाविकास आघाडीला समर्थन दिलं आहे.
अनुसूचित जातीच्या ३४ आणि अनुसूचित जमातीच्या ४९ टक्के समाजाने महायुतीला पाठिंबा दिला आहे. तर महाविकास आघाडीला अनुसूचित जाती आणि जमातीच्या समाजाने अनुक्रमे ४० आणि ३७ टक्के पाठिंबा दिला आहे. ५३ टक्के कुणबी समाज हा महायुतीच्या पाठी मागे आहे. तर ३४ टक्के कुणबी समाजाने महाविकास आघाडीला समर्थन दिलं आहे. तर ७९ टक्के मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला समर्थन दिलं आहे. तर ४ टक्केच मुस्लिम समाजाने भाजप पुरस्कृत महायुतीला पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, कोकण आणि ठाणे पट्टयातील ३९ जागांपैकी महायुतीला २४ तर मविआला १३ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर इतरांना २ जागा दाखविण्यात आल्या आहेत. या भागात मविआला मोठा धक्का बसत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा गड आहे. तिथे महायुतीला ५० टक्के आणि मविआला ३३ टक्के मतदान होताना दिसत आहे. तर मनसेसह इतरांना १५ टक्के मतदान दिसत आहे. मराठवाड्यात ४६ पैकी महायुतीला ३०, मविआला १५ आणि इतर १ अशा जागा मिळतानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात ४७ जागांपैकी महायुतीला ३८, मविआला ७ आणि इतरांना २ जागा मिळण्याची शक्यता आहे.