Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. आचारसंहिता लागू होताच राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीला सक्षम पर्याय तसेच तगडी टक्कर देण्याच्या उद्देशाने परिवर्तन महाशक्ती नावाची तिसरी आघाडी निवडणूक रिंगणात उतरली आहे. या आघाडीत बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह स्वराज्य पक्षाचे प्रमुख युवराज संभाजीराजे छत्रपती यांचाही समावेश आहे. यातच आता ४ नोव्हेंबर रोजी राजकारणात मोठा स्फोट होणार आहे, असे भाकित करत, महाविकास आणि महायुतीचा एन्काउंटर करणार आहोत, असा मोठा दावा परिवर्तन महाशक्ती आघाडीतील नेत्यांनी केला आहे.
महाविकास आघाडी आणि महायुती दोघांना जनता कंटाळली आहे. दोन्ही युती-आघाडीत जागावाटपामध्ये तिढा आहे. भाजपा आणि काँग्रेस एकच आहेत. अर्थकारणात काही बदल झालेला नाही. आम्ही मुद्द्यावर लोकांना घेऊन जाऊ. ४ तारखेला पूर्ण चित्र स्पष्ट होईल आणि मोठा स्फोट होईल. ४ नोव्हेंबरला स्पष्ट होईल, महाशक्ती हा स्फोट करणार आहे, असे मोठे विधान बच्चू कडू यांनी केले आहे.
युती आणि आघाडी या दोघांना पहिले पाडायचे आहे
उमेदवारांच्या ताकदीपेक्षा राजकारण महत्त्वाचे आहे. अर्ज मागे घेतल्यानंतरच पिक्चर क्लिअर होईल. चांगले उमेदवार आणि चांगले मतदारसंघ आमच्याकडे आलेले दिसणार आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांना पहिले पाडायचे आहे. माझ्या मतदारसंघातील लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि मी तिथूनच लढणार आहे, असे बच्चू कडू यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच तिसऱ्या आघाडीच्या निमित्ताने जनता आपल्या पाठीशी राहणार असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला.
मी मुख्यमंत्र्यांच्या घरी गेलोच नव्हतो
मनोज जरांगे पाटील यांच्याशी काही बोलणे झालेले नाही. मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाल्याचे वृत्त माध्यमांनी चालवले. परंतु, प्रत्यक्षात मी मुख्यमंत्र्यांच्या घरी गेलोच नव्हतो. त्यांची आणि माझी भेट झालेली नाही, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. तसेच राजन तेली भाजपाला सोडचिठ्ठी देऊन ठाकरे गटात जाणार आहेत. यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, राजन तेली किंवा त्यांच्याबद्दल मला माहिती नाही.
दरम्यान, परिवर्तन महाशक्तीमध्ये समविचारी अशा तब्बल ३० ते ४० संघटना सहभागी झाल्या आहेत. सर्वांचे विधानसभेच्या १५० जागांवर एकमत झाले आहे. स्वराज्य पक्षाच्या कार्यालयात परिवर्तन महाशक्ती आघाडीतील राजू शेट्टी, बच्चू कडू, संभाजीराजे तसेच शंकरअण्णा धोंडगे, वामनराव चटप व अन्य संघटनांचे प्रतिनिधींची एक बैठक झाली.