बाळासाहेब थोरातांचा बालेकिल्ला विखेंच्या सभांमुळे चर्चेत
By शेखर पानसरे | Published: November 8, 2024 08:52 AM2024-11-08T08:52:44+5:302024-11-08T08:53:29+5:30
Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला असलेला संगमनेर मतदारसंघ यावेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या सभांनी चर्चेत आला. पण, ऐनवेळी विखे यांनी स्वत: उमेदवारी न करता अमोल खताळ यांना शिंदे गटाकडून रिंगणात उतरवले आहे.
- शेखर पानसरे
संगमनेर - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला असलेला संगमनेर मतदारसंघ यावेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या सभांनी चर्चेत आला. पण, ऐनवेळी विखे यांनी स्वत: उमेदवारी न करता अमोल खताळ यांना शिंदे गटाकडून रिंगणात उतरवले आहे.
या मतदारसंघात थोरात हे १९८५ साली सर्वप्रथम अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर सलगपणे त्यांनी काँग्रेसकडून विजय मिळविला. सहकारी साखर कारखाना, सहकारी दूध संघ, शैक्षणिक संस्था यांचे भक्कम जाळे असल्याने त्यांचे तालुक्यावर वर्चस्व आहे. थोरात विरोधकांना संस्थात्मक तसेच संघटनात्मक जाळे निर्माण करता आले नाही. हा मतदारसंघ शिवसेनेच्या कोट्यात आहे. मात्र, सेनेचे संघटन नाही. केवळ निवडणुकीत संघटनेची चर्चा होते. यावेळी सेनेपेक्षाही भाजपचे विखे येथे आक्रमक झाले आहेत. मात्र, मतदारसंघ भाजपने न घेता तो शिंदेसेनेकडे गेला. भाजपचे अमोल खताळ हे येथे शिंदेसेनेकडून उमेदवारी करत आहेत.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
महाविकास आघाडीची सत्ता आल्यास थोरात हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा राहू शकतात. त्यामुळे तो मुद्दा चर्चेत आहे.
सुजय विखे पाटील यांच्या सभेत वसंत देशमुख यांनी थोरातांच्या कन्या जयश्री देशमुख यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले. महिलांच्या अवमानाचा हा मुद्दा कॉंग्रेस प्रत्येक सभेत मांडत आहे.
महायुतीकडून विखे प्रचारात सक्रिय झाले. त्यामुळे या निवडणुकीला थोरात विरुद्ध विखे या वादाची झालर आली आहे.
निळवंडे धरणाचे पाणी संगमनेर, राहाता तालुक्याला आपण मिळवून दिले हा थोरातांचा प्रचाराचा मुद्दा आहे. दुसरीकडे विखे पाटील देखील या बाबीचे श्रेय घेत आहेत.