"बटेंगे तो पॉकेट कटेंगे और भाजपावाले हटेंगे तो दाम घटेंगे", महागाईवरून काँग्रेसचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 02:38 PM2024-11-14T14:38:58+5:302024-11-14T14:39:39+5:30
Maharashtra Assembly Election 2024: महागाईतून मोदी सरकार प्रत्येक मराठी कुटुंबाच्या खिशातून वर्षाला ९० हजार रुपये लुटत आहे आणि जनतेच्या या मुळ मुद्द्यांपासून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी बटेंगे, कटेंगे, व्होट जिहाद सारखी नारेबाजी केली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला.
मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या सरकारमुळे महागाईचा आगडोंब उसळला असून खाद्यतेलासह, किराणा मालाचे भाव प्रचंड वाढले आहेत. लसून ५०० रुपये किलो तर कांदा १०० रुपया किलो झाला आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्य तसेच मध्यमवर्गीय कुटुंबाचे किचनचे बजेट कोलमडले आहे. या महागाईतून मोदी सरकार प्रत्येक मराठी कुटुंबाच्या खिशातून वर्षाला ९० हजार रुपये लुटत आहे आणि जनतेच्या या मुळ मुद्द्यांपासून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी बटेंगे, कटेंगे, व्होट जिहाद सारखी नारेबाजी केली जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या मीडिया व पब्लिसिटी विभागाचे चेअरमन पवन खेरा यांनी केला.
मुंबईतील टिळक भवनमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करताना पवन खेरा यांनी भाजपा सरकारच्या कारभारावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून भाजपाचा गल्लीतील नेतेही जगातील सर्व मुद्द्यांवर प्रवचन देतात पण जनतेला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवर एक शब्दही बोलत नाहीत, हीच भाजपाच्या प्रचाराची दिशा आहे. झारखंडमधील प्रचारात पंतप्रधान मोदींनी घुसखोरी झाल्याचे सांगितले पण देशात तर ११ वर्षांपासून मोदींचेच सरकार आहे मग ही घुसखोरी झालीच कशी? महाराष्ट्राच्या प्रचारातही तेच होत आहे. बटेंगे कटेंगे, एक हें तो सेफ हैं, व्होट जिहाद हेच सुरु आहे. भाजपा जनतेला मुर्ख समजत असेल पण जनतेला भाजपाचा हा डाव चांगलाच माहित आहे. प्रत्येक मराठी कुटुंबाच्या खिशातून वर्षाला ९० हजार रुपये लुटून महिलांना १५०० रुपये दिल्याच्या फुशारक्या मारत आहेत. मोदी व भाजपाने ९० हजार रुपयांच्या लुटीचा हिशाब द्यावा, असे पवन खेरा म्हणाले.
महाविकास आघाडीची पंचसुत्री लागू करण्यासाठी वर्षाला ५ लाख कोटी रुपये लागतील, एवढे पैसे कुठून आणणार या प्रश्नाला उत्तर देताना पवन खेरा म्हणाले की, जनकल्याणकारी योजनांसाठी पैसे कुठून आणणार या प्रश्नाचे उत्तर दोन दिवसापूर्वीच हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खू यांनी दिले आहे. युपीए सरकारने मनरेगा योजना सुरु केली त्यावेळीही भाजपा नेते अरुण जेटली, व सुषमा स्वराज यांनी हाच प्रश्न विचारला होता पण युपीए सरकारने मनरेगा योजना व्यवस्थित राबविली. महाराष्ट्रातील मविआचे सरकार पाडण्यास आमदाराला ५० खोके देण्यासाठी पैसे असतील तर जनतेला देण्यासाठी पैसे देण्यात काय अडचण आहे? असा सवालही पवन खेरा यांनी विचारला.