एकाच मतदारसंघात काँग्रेस आणि शरद पवार गटाने उतरवले उमेदवार; मैत्रीपूर्ण लढत होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 01:21 PM2024-10-29T13:21:59+5:302024-10-29T13:23:52+5:30
राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एबी फॉर्म देण्यात आला आहे
पंढरपूर - महाविकास आघाडीत पंढरपूरच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात वाद सुरू आहेत. या जागेवर या दोन्ही पक्षांनी उमेदवार उतरवले आहेत. पंढरपूरच्या जागेवर माजी आमदार प्रशांत पारिचारक यांना राष्ट्रवादीत आणून उमेदवारी देण्याचा विचार शरद पवारांचा होता. पारिचारक न आल्यास भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्याचा पर्याय ठरला. त्यातच खासदार प्रणिती शिंदे यांनी दिल्ली गाठत काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि भगीरथ भालके यांची भेट घडवून आणली. त्यानंतर काँग्रेसने भगीरथ भालकेंना पंढरपूरातून उमेदवारी जाहीर केली.
पंढरपूर मतदारसंघात काँग्रेसनं भालकेंना उमेदवारी जाहीर करताच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते गडबडून गेले. आता या मतदारसंघात पवार गटाकडून अनिल सावंत यांना अर्ज भरायला सांगितला आहे. २०१९ च्या निवडणुकीत पंढरपूरच्या जागेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत वाद होता. भारत भालकेंनी अचानक काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसनं भालकेंविरोधात शिवाजीराव काळुंगे यांना अपक्ष अर्ज भरायला लावल्याची चर्चा होती. आता पुन्हा एकदा पंढरपूरच्या जागेवरून महाविकास आघाडीत वाद पेटला आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एबी फॉर्म देण्यात आला आहे. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सावंत यांना फॉर्म दिला. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पंढरपूर मतदारसंघात उमेदवारी दिल्याने आघाडीत बिघाडी झाल्याची चिन्हे आहेत. पंढरपूरात महायुतीकडून विद्यमान भाजपा आमदार समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे. तर मनसेनं या मतदारसंघात दिलीप धोत्रे आणि आता काँग्रेसकडून भगीरथ भालके, राष्ट्रवादीकडून अनिल सावंत यांच्या उमेदवारीने ही लढत चौरंगी झाली आहे.
मुंबईतही आघाडीत बिघाडी?
वांद्रे पूर्व या जागेवर ठाकरे गटाकडून वरूण सरदेसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र या जागेवर इच्छुक असलेले काँग्रेस नेते अर्जुन सिंह यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वर्सोवा, घाटकोपर पश्चिम, वांद्रे पूर्व, भायखळासह काही जागांवर असाच वाद सुरू आहे. वर्सोवा जागेवर माजी पोलीस आयुक्त संजय पांडे, अवनीत सिंह यांच्यासह इतर नेते इच्छुक होते. तर अंधेरी पूर्व मतदारसंघातून माजी मंत्री सुरेश शेट्टी हे काँग्रेसकडून लढण्यास इच्छुक होते. त्यामुळे मुंबईतही अनेक जागांवर महायुती असो वा महाविकास आघाडी यांच्यात बंडखोरी होण्याची चिन्हे आहेत.