पवार कुटुंबात राजकीय वर्चस्वाचा वाद आता एवढा पुढे गेला आहे की काका पुतण्याची लढाई आता दुसऱ्या पिढीपर्यंत आली आहे. शरद पवारांनी बारामती मतदारसंघातून अजित पवारांविरोधात त्यांचाच सख्खा पुतण्या युगेंद्र पवार यांना उतरविले आहे. युगेंद्रंसाठी शरद पवार बारामतीत प्रचार, गाठीभेटी घेत आहेत. अशातच आज भाऊबीज होती. पवार कुटुंब दरवर्षी एकत्र येत भाऊबीज साजरी करते. गेल्यावर्षीही पक्ष फुटल्यावर भाऊबीज साजरी झाली होती. परंतू, यंदा अजित पवारसुप्रिया सुळेंकडे भाऊबीजेला येणार का, असा प्रश्न विचारला जात होता. आता सुळे यांनीच फोटोंचा व्हिडीओ पोस्ट करून स्पष्ट केले आहे.
सुप्रिया सुळे यांनी फोटो असलेल्या व्हिडीओची ट्विटरवर पोस्ट टाकत सर्वांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये कुठेही अजित पवार किंवा त्यांचे कुटुंबीय दिसत नाहीत. शरद पवारांच्या बहीणी, अजित पवारांच्या बहीणी या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. बारामतीत ही भाऊबीज साजरी करण्यात आली. यात युगेंद्र पवारही दिसत आहेत.
अजित पवार बारामतीत असूनही भाऊबीजेच्या कार्यक्रमाला गेले नाहीत. गेल्या वर्षी पुण्यात शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या घरी भाऊबीज साजरी झाली होती. तेव्हा अजित पवार, सुनेत्रा पवार आले होते. परंतू, यंदा सर्व कुटुंबीय बारामतीत असूनही अजित पवार तिकडे फिरकले नसल्याने विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.
पवार कुटुंबात निर्माण झालेली दरी आता काही केल्या भरून निघणार नाही असेच संकेत मिळत आहेत. राजकारणात काहीही होऊ शकते असे वक्तव्य अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते. परंतू, बारामतीच्या दौऱ्यावर असूनही अजित पवार कुटुंबाच्या कार्यक्रमाला आले नाहीत, यामुळे राजकीय वितुष्टाबरोबर अजित पवारांसोबत कौटंबिक संबंधही बिघडले आहेत की काय, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.
सुप्रिया सुळे आणि अजित पवार आज संध्याकाळपर्यंत एकत्रित येतील भाऊबीज साजरी करतील. यावेळी एकत्रित भाऊबीज साजरी नाही केली तर निदान पुढच्या वर्षी तरी भाऊबीजेला त्यांनी एकत्रित आलं पाहिजे असे भुजबळांनी म्हटले होते.