मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आता काहीच तास शिल्लक आहेत. त्यात बंडखोरांमुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. भिवंडी पूर्व या मतदारसंघात मविआने समाजवादी पक्षाचे रईस शेख यांना पाठिंबा दिला आहे. मात्र याठिकाणी इच्छुक उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. विशेष म्हणजे या उमेदवारीला काँग्रेसच्या माजी खासदारांनीही पाठिंबा दिला आहे.
भिवंडी पूर्व मतदारसंघात रईस शेख समाजवादी पक्षाकडून रिंगणात आहेत तर मानखुर्द शिवाजीनगर भागात अबु आझमी निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरेंकडून समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यात आला आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेला त्यांच्या माजी आमदारासह कार्यकर्त्यांनी विरोध करत भिवंडी पूर्व इथं अपक्ष लढण्याची तयारी केली आहे. त्यात माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी म्हटलं की, भिवंडीच्या बाबतीत एकदा नव्हे तर वारंवार अन्याय झाला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला सांगितले आहे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो त्यामुळे आम्ही अन्याय सहन करणार नाही. अन्यायाविरोधात लढणार आहोत. लोकसभेला ४ वेळा पराभूत झालेल्या माणसासाठी आम्ही प्रचार केला, त्याला जिंकून आणलं. आता विधानसभेला आमच्यावर अन्याय होणार नाही असं वाटलं मात्र या अन्यायाविरोधात आम्ही लढत आहोत असं त्यांनी सांगितले.
तसेच ज्या ज्या मतदारसंघात समाजवादीची किंवा मुस्लीम मतांची आवश्यकता आहे ते वाचवण्यासाठी भिवंडीत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला डावलण्यात आलंय हा माझा आरोप आहे. भिवंडीतील जनतेच्या भावनेशी निगडीत मी लढाई करतोय. ज्या लोकांचा माझ्यावर आशीर्वाद आहे. प्रतिष्ठीत मान्यवरांशी चर्चा करून मी निर्णय घेईन. अनेक दिवसांपासून निवडणुकीसाठी कार्यकर्ते तयारीला लागलेत. ही उमेदवारी मिळेल असं त्यांना वाटत होते. पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी मागण्यासाठी गेलो. शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी दिली नाही असं माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी म्हटलं.
संजय राऊत काय म्हणाले?
काही जागा या मित्रपक्षांच्या विद्यमान आमदारांच्या होत्या, त्या जागांवर वारंवार चर्चा होऊनही तिढा सुटला नाही. जशा शिवसेनेच्या विद्यमान आमदारांच्या अनेक जागा आम्ही सोडल्या नाहीत. काँग्रेसच्या जागा ते सोडू शकले नाहीत. समाजवादी पार्टी कुणीही आपल्या जागा सोडायला तयार नव्हते हे सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे. भिवंडीच्या जागेबाबत माजी आमदार रुपेश म्हात्रे सांगतात ती जागा आम्हाला मिळावी, या जागेसाठी आम्ही खूप प्रयत्न केले. पण तिथे समाजवादी पक्षाचा आमदार आहे. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत त्या जागेसाठी प्रयत्न केले पण समाजवादीने ती जागा सोडली नाही त्यामुळे आमच्यासमोर दुसरा पर्याय नव्हता असं संजय राऊतांनी म्हटलं.
काय आहे भिवंडीची स्थिती?
भिवंडीत २०१९ साली समाजवादी पक्षाचे रईस शेख यांनी बाजी मारली. त्यांनी शिवसेनेच्या रुपेश म्हात्रे यांचा १३०० मतांनी पराभव केला. मात्र यंदा राजकीय समीकरण बदलली आहे. त्यात शिवसेनेत २ गट पडलेत. त्यातील उद्धव ठाकरे गटाने रईस शेख यांना पाठिंबा दिला आहे. २०१४ च्या निवडणुकीत रुपेश म्हात्रे या मतदारसंघाचे आमदार होते.
वरळी, वांद्रे मतदारसंघात फायदा?
वरळीत उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर आदित्य ठाकरेंचे मावस भाऊ वरूण सरदेसाई हे वांद्रे पूर्व मतदारसंघात निवडणूक लढवत आहे. यासह इतर मतदारसंघात मुस्लीम मते आपल्याकडे वळवण्यासाठी महाविकास आघाडीत ठाकरेंनी समाजवादी पक्षाला काही जागा सोडल्याचा आरोप रुपेश म्हात्रे यांनी केला. त्यामुळे मुस्लिम मतांचा फायदा वरळी, वांद्रे पूर्व मतदारसंघात होणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.