विधानसभा निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उलटल्यानंतरही अनेक मतदारसंघातील बंडखोरांनी उमेदवारी कायम ठेवल्यानं भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या हीना गावित यांनी आपली उमेदवारी कायम ठेवतानाच भाजपाला रामराम ठोकला आहे. भाजपाकडून नंदूरबार लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या हीना गावित यांनी भाजपाच्या सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
हीना गावित यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी सुरू केली होती. दरम्यान, महायुतीच्या जागावाटपात अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेला. तसेच शिंदे गटाकडून येथे आमश्या पाडवी यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर हीना गावित यांनी अक्कलकुवा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भाजपाकडून हीना गावित यांच्या मनधरणीचे खूप प्रयत्न झाले. मात्र त्यांनी आपली बंडखोरी कायम ठेवली.
दरम्यान, भाजपाला रामराम ठोकताना हीना गावित यांनी शिवसेना शिंदे गटावर घणाघाती टीका केली. त्या म्हणाल्या की, मी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहे. माझ्या उमेदवारीमुळे महायुतीमध्ये भाजपाची कुठेही अडचण होऊ नये म्हणून मी पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत मी महायुतीची उमेदवार होते. मात्र त्यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी खुलेआमपणे काँग्रेसचा प्रचार केला. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून शिवसेना शिंदे गट काँग्रेसचं काम करत होता. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गट नंदूरबार मतदारसंघात करत आहे. त्यामुळे मी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, असे हीना गावित यांनी सांगितले.