जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 02:37 PM2024-11-15T14:37:51+5:302024-11-15T14:39:19+5:30

Maharashtra Assembly Election 2024: जातनिहाय जनगणनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या पक्षाची भूमिका काय आहे हे त्यांनी स्पष्ट करावे. जातनिहाय जनगणनेला भाजपाचा विरोध आहे, त्यामुळेच पंतप्रधान मोदी आरक्षण संपवण्याचा खोटा आरोप काँग्रेस पक्षावर करत आहेत, अशी टीका काँग्रेसचे नेते रमेश चेन्नीथला यांनी केली.

Maharashtra Assembly Election 2024: BJP and Narendra Mondini should declare their position on caste-wise census, Congress's challenge     | जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान

जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान

मुंबई - काँग्रेस अनुसूचित जाती व अनुसुचित जमातींचे आरक्षण  संपवणार असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत खोटा आणि जनतेची दिशाभूल करणारा आहे. काँग्रेसनेच देशाला संविधान व आरक्षण देऊन मागास जातींना हक्क व अधिकार दिले आणि वर्षानुवर्षे मनुवाद्यांनी केलेल्या अत्याचारातून त्यांची सुटका केली. आरक्षण व संविधान संपवण्याचे प्रयत्न तर नरेंद्र मोदींचा भारतीय जनता पक्षच करत आहे, असे  उत्तर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिले आहे.
 
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांनी दलित, आदिवासी, ओबीसी समाजाला सामाजिक न्याय मिळावा यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार किलोमीटरची पदयात्रा काढली आणि जातनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. जातनिहाय जनगणनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या पक्षाची भूमिका काय आहे हे त्यांनी स्पष्ट करावे. जातनिहाय जनगणनेला भाजपाचा विरोध आहे, त्यामुळेच पंतप्रधान मोदी आरक्षण संपवण्याचा खोटा आरोप काँग्रेस पक्षावर करत आहेत. काँग्रेस पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खोट्या आरोपाचा तीव्र निषेधही करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभांना महाराष्ट्रातील जनतेचा प्रतिसाद मिळत नाही. मुंबईतील शिवाजी पार्कवर झालेल्या सभेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. जनता मोदींच्या खोट्या बोलण्यास कंटाळली आहे. नरेंद्र मोदी रिकाम्या खुर्च्यांना संबोधित करत होते. याउलट लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रचार सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उद्या दिनांक १६ नोव्हेंबर रोजी चिमूर व धामणगाव रेल्वे येथे जाहीर प्रचार सभा होत आहेत तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या उद्या शिर्डी व कोल्हापुरात जाहीर सभा तसेच १७ तारखेला गडचिरोली व नागपूरमध्ये प्रचारसभा होतील, असे रमेश चेन्नीथला यांनी सांगितले आहे.

भारतीय जनता पक्षाने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून, देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कांदा व कापसाला योग्य भाव देण्याचे आश्वासन पाळले नाही. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर सोयाबीनला ७००० रुपये प्रति क्विंटल भाव देऊ असेही रमेश चेन्नीथला यांनी जाहीर केले.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत डाव्या विचार सरणीचे लोक होते या देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, भारत जोडो यात्रा हे एक मोठे जनआंदोलन होते. यात सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झाले होते. या यात्रेतून राहुल गांधी यांनी देशातील गरीब, आदिवासी, दलित, वंचित, शेतकरी, महिला, तरुण वर्गांच्या समस्या व वेदना जाणून घेतल्या. भारत जोडो यात्रेला जनतेचा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला, त्यामुळे भाजपा धास्ती बसली आहे त्यातून असे खोटे आरोप केले आहेत असेही रमेश चेन्नीथला म्हणाले. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: BJP and Narendra Mondini should declare their position on caste-wise census, Congress's challenge    

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.