ठाणे हे गद्दारीचं केंद्रबिंदू आहे. या केंद्रबिंदूच्या बुडाला आग लावली तर संपूर्ण महाराष्ट्र गद्दारमुक्त होईल असं उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत म्हटलं आहे. सभा संपून राष्ट्रगीत झाल्यानंतर स्टेजवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शिवसैनिकांची गर्दी झाली. त्याचवेळी स्टेजचा काही भाग अचानक खाली गेला. सुदैवाने उद्धव ठाकरे यांच्यासह इतर कोणालाही दुखापत झाली नाही. या घटनेने खळबळ उडाली. यावरुन भाजपाने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
"स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. "नुसते सावत्र नाही हे भाऊ तर आहेत भलतेच लबाड, अडीच वर्षात लुटले खूप मोठे घबाड. उबाठा सेनेच्या सभेचा स्टेज ठाण्यात खचला, यांच्या प्रत्येक पराभवाचा इतिहास ठाण्यानेच रचला" असं म्हणत हल्लाबोल केला आहे.
आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "स्टेज खचला! संकेत कळला? जनता जेव्हा होती कोरोनात तडफडत, हे सगळे बसले होते नातेवाईकांना कंत्राटे वाटत. रिक्षा, टँक्सी, फेरिवाल्यांना दिला एक रुपया. ना आठवण झाली कधी लाडक्या बहिणींची, घरे भरली स्वतःची, दारुवाले आणि बिल्डरांची. नुसते सावत्र नाही हे भाऊ तर आहेत भलतेच लबाड, अडीच वर्षात लुटले खूप मोठे घबाड. त्यांचे एक टोक होते १०० कोटीची ती वसूली, या कफन चोरांना लाज नाही कसली."
"काल उबाठा सेनेच्या सभेचा स्टेज ठाण्यात खचला, यांच्या प्रत्येक पराभवाचा इतिहास ठाण्यानेच तर रचला! यांच्या भाषणांचा प्रभाव पाहा किती? भाषण संपताच खचते पायाखालची माती!!" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तर दुसरीकडे सभेतून उद्धव ठाकरे यांनी "ठाण्याला गद्दारीचा कलंक लागला आहे. हा कलंक आता पुसण्याची वेळ आली आहे. ठाणे महापालिकेला यांनी भिकेला लावलं आहे. हे आणि यांचे बगलबच्चे आणि कॉन्ट्रॅक्टर यांनी पालिकेची तिजोरी रिकामी केली आहे" असं म्हणत टीका केली होती.