महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. याच दरम्यान भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का..?” असा संतप्त सवाल विचारला आहे. तसेच “कोरं संविधान छापणं हा आमच्या महामानवाचा अपमान आहे. तो आम्ही भारतीय सहन करणार नाही. संविधान म्हणजे भारताचा आत्मा आहे. जनता तुम्हाला माफ करणार नाहीच” असं म्हणत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का..? लोकसभा निवडणुकीपासून हातात संविधान घेऊन संविधान वाचवा म्हणून जो काही कांगावा करत आहात त्यातला खोटे पणा जनतेच्या कधीच लक्षात आला आहे, पण काल मात्र तुम्ही हद्दच केली… संविधानाच्या कोऱ्या प्रती तुम्ही वाटल्या आणि तिच प्रत हातात घेऊन खोटी नाटी आश्वासनं दिलीत?”
“वर तुमचे नेते विजय वड्डेटीवार तुमची बाजू घेण्याच्या नादात आणि भाजपला खोटं ठरवण्याच्या नादात म्हणाले ते लाल रंगाचे नोटपॅड होते. म्हणजेच एकाअर्थाने त्यांनी तुमचा हा थिल्लरपणा कबुलही केला. कोरं संविधान छापणं हा आमच्या महामानवाचा अपमान आहे. तो आम्ही भारतीय सहन करणार नाही. तुमच्यासाठी शाहु-फुले-आंबेडकर हे फक्त भाषण करण्याचे मुद्दे असतील आमच्यासाठी तो स्वाभिमान आहे. आणि संविधान म्हणजे भारताचा आत्मा आहे. जनता तुम्हाला माफ करणार नाहीच…” असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
“नागपुरात राहुल गांधी यांनी कोरं संविधान दाखवून संविधानाचा अवमान केला तर मुंबईत संविधानाचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचा द्वेष दिसून आला. आधी संविधानाचा अपमान करायचा आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्याचं सौजन्यही दाखवायचं नाही. यातून राहुल गांधींची संकुचित वृत्ती आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधातील मानसिकता दिसून येते. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा हा अपमान महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही” असं म्हणत महाराष्ट्र भाजपाने राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.