सलग दोन दिवस माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बॅगा निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासल्याचा मुद्दा गाजत आहे. बॅगा तपासल्यानंतर उद्धव ठाकरे हे आयोगाच्या अधिकाऱ्यांवर संतापले होते. फक्त विरोधकांच्याच बॅगा तपासल्या जात आहेत का? असा सवालही केला होता. याच दरम्यान भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "उद्धव ठाकरेंना समोर हार दिसते आहे म्हटल्यावर सध्या ते बिथरलेत" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे.
"उद्धवजी... बॅगा फक्त तुमच्या तपासल्या जात नाही तर प्रत्येकाच्या बॅगा तपासल्या जातात. मात्र प्रत्येकजण तुमच्यासारखा कांगावा करत नाही. आम्हाला तेवढा वेळ सुद्धा नाही" असं म्हणत निशाणा साधला आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बॅग चेक करतानाचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
"उद्धव ठाकरेंना समोर हार दिसते आहे म्हटल्यावर सध्या ते बिथरलेत... लहान सहान गोष्टींवर कांगावा करताना ते दिसताहेत... सध्या उबाठांचा निवडणूक आयोगाकडून तपासण्यात येणाऱ्या बॅग्सचा व्हिडीओ फिरतोय... अहो उद्धवजी... बॅगा फक्त तुमच्या तपासल्या जात नाहीत तर प्रत्येकाच्या बॅगा तपासल्या जातात. मात्र प्रत्येकजण तुमच्यासारखा कांगावा करत नाही. आम्हाला तेवढा वेळ सुद्धा नाही."
"चला तुम्हाला देवेंद्रजींचा व्हिडीओ पाहायचा होता ना? हा घ्या व्हिडीओ... ७ नोव्हेंबरचा व्हिडीओ आहे बरं नाहीतर परत कांगावा कराल. हा कांगावा करत असताना उद्धव ठाकरेंचा मूळ स्वभाव पुन्हा एकदा पाहायला मिळतो. उद्धवजी तुम्ही विसरलात की ही लोकशाही आहे... इथे गुंडशाहीला थारा नाही. जातीयवादाला जागाच नाही."
"तुमचे पाणचट जातीयवादी टोमणे एका गरिब माणसाच्या जिव्हारी लागू शकतात. निवडणूक आयोगाकडून प्रत्येकाची तपासणी होत असते मग ते विरोधक असो किंवा सत्ताधारी. तुमच्यासारखा पाणचटपणा करण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही. आमचा वेळ हा जनतेचा आहे. तुमचा कांगावा हा फेक नरेटिव्हचा भाग आहे. याला जनता भूलणार नाही" असं म्हणत चित्रा वाघ यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
"विरोधी पक्षांच्या नेत्यांना टार्गेट केलं जातंय"
राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सुप्रिया सुळे यांनी हल्लाबोल केला आहे. "सातत्याने विरोधी पक्षांच्या नेत्यांच्याच बॅगा कशा चेक होतात. उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं जातंय. रोज उद्धवजींची मग अमोल कोल्हे यांची... असं कसं होऊ शकतं? आज कशी बॅगची तपासणी झाली... कारण टीव्हीवर दोन दिवस उद्धवजी यांची तपासणी केल्याचं दाखवलं. इतके दिवस का नाही झाली? उद्धव ठाकरेंच्या आधी फडणवीसांच्या बॅगांची तपासणी का झाली नाही? आणि जर आधी झाली असेल तर आधी का सांगितलं नाही?" असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला आहे.