भाजप-काँग्रेस तब्बल ७४ जागांवर आमने-सामने, विधानसभेच्या २५% मतदारसंघांत दोन राष्ट्रीय पक्षांत होणार झुंज

By यदू जोशी | Published: November 4, 2024 11:39 AM2024-11-04T11:39:55+5:302024-11-04T11:40:37+5:30

Maharashtra Assembly Election 2024: भारतीय जनता पक्ष व काँग्रेस हे दोन राष्ट्रीय पक्ष विधानसभा निवडणुकीत तब्बल ७४ मतदारसंघांमध्ये आमने-सामने लढत आहेत. याचा अर्थ राज्यातील एकूण लढतींपैकी २५ टक्के लढती या दोन परंपरागत प्रतिस्पर्ध्यांमध्ये होतील.

Maharashtra Assembly Election 2024: BJP-Congress face-to-face in as many as 74 seats, two national parties will fight in 25% constituencies of the Legislative Assembly | भाजप-काँग्रेस तब्बल ७४ जागांवर आमने-सामने, विधानसभेच्या २५% मतदारसंघांत दोन राष्ट्रीय पक्षांत होणार झुंज

भाजप-काँग्रेस तब्बल ७४ जागांवर आमने-सामने, विधानसभेच्या २५% मतदारसंघांत दोन राष्ट्रीय पक्षांत होणार झुंज

- यदु जोशी  
मुंबई -  भारतीय जनता पक्ष व काँग्रेस हे दोन राष्ट्रीय पक्ष विधानसभा निवडणुकीत तब्बल ७४ मतदारसंघांमध्ये आमने-सामने लढत आहेत. याचा अर्थ राज्यातील एकूण लढतींपैकी २५ टक्के लढती या दोन परंपरागत प्रतिस्पर्ध्यांमध्ये होतील.

भाजपचे अनेक दिग्गज नेते काँग्रेस विरोधात लढत आहेत. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, डॉ. विजयकुमार गावित, संभाजी पाटील निलंगेकर, डॉ. संजय कुटे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, माजी मंत्री मदन येरावार, अशोक उईके यांचा समावेश आहे.

भाजपविरोधात लढत असलेल्या काँग्रेस नेत्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री नितीन राऊत, यशोमती ठाकूर, अस्लम शेख, वसंत पुरके, अमित देशमुख, त्यांचे बंधू धीरज देशमुख, विश्वजीत कदम, आदींचा समावेश आहे.

गेल्या वेळी होते अपक्ष, आता भाजपचे उमेदवार 
चंद्रपूरमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस आणि अपक्ष, असा सामना २०१९ मध्ये झाला होता आणि अपक्ष किशोर जोरगेवार ७२ हजारावर मतांनी जिंकले होते, ते यावेळी भाजपचे उमेदवार आहेत. गेल्यावेळी काँग्रेस चौथ्या क्रमांकावर होती. 
गोंदियामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना झाला होता, अपक्ष विनोद अग्रवाल विजयी झाले होते, तेच यावेळी भाजपचे उमेदवार आहेत. गेल्यावेळी भाजपचे उमेदवार असलेले गोपालदास अग्रवाल हे यावेळी काँग्रेसचे उमेदवार आहेत.

विदर्भात कुणाची सरशी? 
- विदर्भ हा एकेकाळचा काँग्रेसचा गड, पण गेल्या काही वर्षांमध्ये भाजपने तो हिसकावून घेतला. मात्र, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्राबल्य राहिले.
- हा निकाल टिकविण्याचे आव्हान काँग्रेससमोर असेल. तर, तो एक अपवाद होता, विदर्भावर वर्चस्व भाजपचेच हे सिद्ध करण्याचे आव्हान भाजपसमोर असेल.  

२०१९ मध्ये या ७४ जागांवर काय स्थिती? 
- या ७४ पैकी ४२ जागा २०१९ च्या निवडणुकीत भाजपने, तर काँग्रेसने २४ जागा जिंकल्या होत्या. बहुजन विकास आघाडी दोन, प्रहार जनशक्ती पक्ष दोन, राष्ट्रवादी एक, तर तीन अपक्षांनी जिंकल्या होत्या.
- तीन अपक्षांपैकी मीरा-भाईंदरची जागा गेल्यावेळी भाजपच्या बंडखोर गीता जैन यांनी जिंकली होती. त्यांनी भाजपचे नरेंद्र मेहता यांचा पराभव केला होता. तेच मेहता यावेळीही भाजपचे उमेदवार आहेत. गेल्यावेळी तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले मुजफ्फर हुसेन हेच याहीवेळी काँग्रेसकडून लढत आहेत. 
 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: BJP-Congress face-to-face in as many as 74 seats, two national parties will fight in 25% constituencies of the Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.