Maharashtra Assembly Election 2024: जागावाटपावरून महाविकास आघाडीतील बिघाडी वाढत असल्याचे दिसत आहे. तर महायुतीच्या काही जागा सोडल्यास बाकी जागावाटप जवळपास पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. यातच भाजपाची पहिली यादी जाहीर झाली असून, ९९ मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. राजकीय घडामोडींना वेग आला असून, तीन वेळा माजी आमदार असलेल्या लोकप्रतिनिधीने भाजपाला सोडचिठ्ठी देत रामराम केला आहे. माजी आमदारांनी परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रातील जनतेला चांगला पर्याय देण्यासाठी परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी एकत्रितपणे समोर आली आहे. परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी स्थापन झाल्यापासून राज्यभरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. एवढी अपेक्षा मीही केली नव्हती, अशी प्रांजळ कबुली द्यायला हरकत नाही. संपूर्ण महाराष्ट्रातून संपर्क साधला जात आहे. सोबत काम करायचे आहे, परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडीतून उमेदवारी हवी आहे, अनेक लोक भेटून गेले आहेत. आम्ही आमची उमेदवारी यादी मुद्दामहून जाहीर केलेली नाही आणि करणारही नाही, असे संभाजीराजेंनी नमूद केले. भाजपाचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यावेळी संभाजीराजे पत्रकारांशी बोलत होते. माजी आमदार सुभाष साबणे यांनी संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षात प्रवेश केला.
देगलूर-बिलोली मतदारसंघातून उमेदवार असतील
नांदेडमधून तीन वेळा आमदार राहिलेले आहेत. ते माजी आमदार सुभाष साबळे हे परिवर्तन महाशक्तीत प्रवेश करत आहेत. परिवर्तन महाशक्तीमध्ये इतके एकमत आहे की, कोणाच्या माध्यमातून त्यांना पुढे घेऊन यायचे, याबाबत आम्ही निर्णय घेणार आहोत. सुभाष साबळे परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडीतून निवडणूक लढवणार. देगलूर-बिलोली मतदारसंघातून ते उमेदवार असतील, अशी घोषणाही संभाजीराजे यांनी केली. जे चांगले उमेदवार आहे, अनुभवी आहे, अशा प्रस्थापितांनाही आम्ही सोबत घेणार आहोत. महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतील, त्यांनाही संधी देण्यात येणार आहे. सुभाष साबळे यांचे परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडीत स्वागत करतो आणि आता तुम्ही तयारीला लागा, असा शब्दही देतो, असे संभाजीराजे म्हणाले.
कोण आहेत माजी आमदार सुभाष साबळे?
नांदेडमधील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष साबणे यांचा स्वराज्य पक्षात पक्षप्रवेश पार पडला. सुभाष साबणे सन १९९९, २००४ आणि २०१४ या निवडणुकीमध्ये तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहे. शिवसेनेच्या उमेदवारीवर सुभाष साबणे जिंकून आलेले आहेत. सध्या ते भाजपामध्ये होते. भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा देत स्वराज्य पक्षात प्रवेश केला आहे. दोन वर्षापूर्वी त्यांनी शिवसेनेतून भाजपात प्रवेश केला होता. सुभाष साबणे यांनी बिलोली-देगलूर विधानसभेची पोटनिवडणूक भाजपाच्या चिन्हावर लढवली होती. रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या विरोधात जितेश अंतापूरकर हे उमेदवार होते. जितेश अंतापूरकर पोटनिवडणुकीत विजयी झाले.
तिकीट न दिल्याने नाराजी अन् भाजपातून राजीनामा
यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी सुभाष साबणे यांनी भाजपाकडून तिकीट मागितल्याच्या चर्चा होत्या. सुभाष साबणे यांनी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य, लाडकी बहीण योजना समिती अध्यक्ष, जिल्हा नियोजन समिती सदस्य या तिन्ही पदांचा राजीनामा दिल्याची माहिती देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये १०० टक्के प्रामाणिक काम केले. अडीच वर्ष सातत्याने पक्षाचे काम सुरु होते. मात्र, ज्या नेत्याने लोकसभा निवडणुकीत भाजपाचे काम केले नाही, त्याला भाजपात घेऊन विधानसभा निवडणूकीची उमेदवारी दिली जाते आहे, असा दावा करत सुभाष साबणे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली.