सोलापूर : भाजप सरकारच्या ताब्यात देशातील चेन्नई, कोलकाता, बंगळुरु, हैदराबादसारख्या इतर मेट्रो सिटी नाहीत. त्यामुळे ते महायुतीच्या नावाखाली दोन पक्षांना एकत्र करुन मुंबईला लुटण्याचा डाव आखत आहेत, असा आरोप तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी रविवारी (दि.१८) पत्रकार परिषदेत केला.
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले, भाजपने दोन निवडणुकीत 'गॅरंटी कार्ड' नावाची टुम काढली. हे गॅरंटी कार्ड फेल गेले. भाजप सरकार केवळ देशातील उद्योगपतींसाठी काम करीत आहे. या उद्योगपतींसाठी या सरकारने डबल इंजिन नावाचे सरकार आणले. भाजप सरकारच्या हातात दिल्ली शहर नाही. तिथे केजरीवाल यांची सत्ता आहे.
कोलकाता शहरात ममता दीदींची सत्ता आहे. चेन्नईमध्ये स्टॅलिन, बंगळुरुमध्ये सिद्धरामय्या आणि हैदराबाद शहरात काँग्रेसची सत्ता आहे. आता केवळ मंबई शहर राहिले, या शहरातील धारावीच्या प्रोजेक्टमधून सरकारला लूट करायची आहे. त्यासाठी त्यांनी दोन वेगवेगळ्या विचारधारांच्या पक्षांसोबत महायुती केली. ही महायुती नव्हे तर लूट करण्याची नीती आहे, असे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले.
"भाजपला एकट्याला सत्ता का राखता आली नाही?"भाजपने 'एक है तो सेफ हैं' असा नारा दिला आहे. यावर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले, भाजपने 'एक है तो सेफ हैं' नारा देताना एकनाथ शिंदे, अजित पवार यांना सोबत का घेतले, याचे उत्तर द्यावे. भाजप एकट्याने महाराष्ट्रात सत्ता का राखता आली नाही. इतरांना सोबत घेऊन आपल्याच माणसाला उपमुख्यमंत्री केले. तुम्हाला इतरांची गरज का भासते याचे उत्तर द्यावे.