विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 07:44 PM2024-11-17T19:44:13+5:302024-11-17T19:46:52+5:30
राखीव मतदारसंघ वगळता वाट्याला आलेल्या ३५पैकी १९ जागांवर समाजबांधवांना संधी
नागपूर - महायुतीत विदर्भातील ६२ पैकी ४७ जागांवर भाजपाचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सुमारे बारा विधानसभा मतदारसंघ राखीव असल्याने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना स्थान देण्यात आले. उर्वरित ३५पैकी तब्बल १९ मतदारसंघांमध्ये भाजपाने कुणबी व इतर समाजातील उमेदवारांना संधी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. याची सरासरी टक्केवारी ५४.२८ इतकी आहे. या माध्यमातून बहुसंख्य कुणबी व मराठा समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात भाजपाने उमेदवारीत प्रतिनिधीत्व देऊन सामाजिक समीकरण साधल्याचा विश्वास समाज बांधवांमधून व्यक्त होत आहे.
विदर्भात भाजपाच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघांमध्ये उत्तर नागपूर, उमरेड, आमगाव, गडचिरोली, आरमोरी, चंद्रपूर, राळेगाव, आर्णी, उमरखेड, मेळघाट, मूर्तिजापूर, वाशीम हे राखीव आहेत. उर्वरित मतदारसंघांमध्येचा विचार करता नागपूर जिल्ह्यात भाजपने पश्चिम नागपूरमधून सुधाकर कोहळे, दक्षिण नागपूरमधून मोहन मते, सावनेरात डॉ. आशिष देशमुख, हिंगण्यात समीर मेघे यांना उमेदवारी दिली आहे. यासोबतच भंडारा जिल्ह्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध कुणबी समाजातील अविनाश ब्राह्मणकर यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी मतदारसंघात विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना धक्का देण्यासाठी कृष्णलाल सहारे यांना संधी देण्यात आली आहे. सहारे यांच्या नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या रॅलीतील समाज बांधवांच्या उपस्थितीने वडेट्टीवारांना ब्रह्मपुरीत तळ ठोकण्यासाठी बाध्य केले. राजुऱ्यात देवराव भोंगळे तर वरोऱ्यात करणे देवतळे हे लढत देत आहेत. वर्धा जिल्ह्यातील चारपैकी दोन मतदारसंघांत भाजपाचे कुणबी उमेदवार आहेत. वर्ध्यात पंकज भोयर तर आर्वीत सुमित वानखेडे लढत देत आहेत. अमरावती जिल्ह्यातील तिवस्यात राजेश वानखेडे, अचलपूरमध्ये प्रवीण तायडे आणि धामणगाव रेल्वेत प्रताप अडसड हे उमेदवार आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोला पूर्वमध्ये रणधीर सावरकर, अकोटमध्ये प्रकाश भारसाकळे; बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये अँड. आकाश फुंडकर, जळगाव-जामोदमध्ये माजी मंत्री संजय कुटे, चिखलीत श्वेता महाले तर वाशीम जिल्ह्यातील कारंजात सई डहाके यांना उमेदवारी दिली आहे.
विदर्भातील ओबीसी समीकरणांचा विचार करता कुणबी हा प्रमुख घटक आहे. पूर्व आणि पश्चिम विदर्भातील संपूर्ण अकराही जिल्ह्यांमध्ये कुणबी समाजाची लोकसंख्या अधिक आहे. यानंतर तेली, माळी, पोवार आणि इतर समाजांचा समाजाची संख्या आहे. हीच बाब लक्षात घेऊन लोकसंख्येच्या प्रमाणात कुणबी व मराठा समाजाला भाजपाने उमेदवारीत प्रतिनिधीत्व दिले. उमेदवारांच्या प्रत्येक यादीत हे समीकरण कायम ठेवण्यात आले. मागील काही वर्षांत ओबीसी मंत्रालयाची स्थापना, ओबीसी वसतिगृह, ओबीसींसाठी स्वाधार योजना अशा अनेक नवनवीन भाजपाने सुरू केल्या. केवळ योजनांच्या माध्यमातूनच नव्हे तर सत्तेतही त्यांना सहभागी करून घेण्यासाठी निम्म्याहून अधिक जागांवर कुणबी व मराठा उमेदवार दिले आहेत.
राहुल गांधींचा हा कुठल्या न्याय?
काँग्रेस नेते राहुल गांधी ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्याचे वचन आपल्या सभांमधून देत आहेत. पण, विदर्भात उमेदवारी वाटप करताना त्यांच्या पक्षातील नेत्यांना नव्हे खुद्द त्यांनाही या बाबीचा विसर पडल्याचे दिसून येते. विदर्भात बहुसंख्य असलेल्या कुणबी व मराठा समाजाला अपेक्षित संधी देण्यात आली नाही. हा कुठला न्याय आहे, अशा शब्दांत कुणबी समाजातील नेत्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
पटोले, वडेट्टीवारांविरुद्ध भाजपाचे ‘कुणबी अस्त्र’
विदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे दोन बडे नेते आहेत. या दोन्ही नेत्यांच्या मतदारसंघात भाजपने अविनाश ब्राह्मणकर आणि कृष्णलाल सहारे यांच्या रुपाने कुणबी उमेदवार दिले आहेत. पटोलेंच्या साकोलीत कुणबी विरुद्ध कुणबी अशी थेट लढत होत आहे. पटोले यांनी समाजासाठी आजवर काय केले, असा सवाल करीत कुणबी समाज आपल्या भावना व्यक्त करीत असल्याने ब्राह्मणकर यांना समाजाचे बळ मिळू लागल्याचे चित्र आहे. यातूनच या मतदारसंघातील चुरस वाढली आहे. तर ब्रह्मपुरीत सहारे यांच्यासाठी कुणबी समाज एकवटल्याचे चित्र असल्याने वडेट्टीवार यांनी अधिक लक्ष आपल्या मंतदारसंघावर केंद्रीत केले आहे.