सांगली - २० तारखेला महाराष्ट्रात मतदान होणार आहे, त्यात तुम्हाला निर्णायक भूमिका घ्यावी लागेल. मी दीड महिन्यापूर्वी महाराष्ट्राचा दौरा केला. जिथं जिथं मी गेलो, मग विदर्भ, मुंबई, कोकण, कोल्हापूर, जळगाव उत्तर महाराष्ट्रात गेलो तिथे तिथे महायुती सरकार बनवायचं आहे आणि देवेंद्र फडणवीसांना विजयी करायचं आहे असं विधान भाजपा नेते अमित शाह यांनी केले आहे.
सांगलीतल्या शिराळा येथील सभेत ते बोलत होते. अमित शाह यांनी फडणवीसांना विजयी करायचं आहे या विधानानं राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यात देवेंद्र फडणवीसांचे नाव घेऊन पुढील मुख्यमंत्रिपदाचे संकेत शाहांनी दिले असंही बोललं जात आहे. त्याशिवाय महाविकास आघाडीवरही शाहांनी निशाणा साधला. जर चुकून महाविकास आघाडीचं सरकार आले तर उद्धव ठाकरे त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री बनवू इच्छितात, शरद पवारांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री बनवायचं आहे. काँग्रेस पक्षात १ डझन नेते मुख्यमंत्रिपदासाठी कपडे शिवून बसलेत असा टोला त्यांनी लगावला.
तसेच जे लोक त्यांच्या मुला मुलींना मुख्यमंत्री बनवण्यासाठी काम करतायेत. ते शिराळातील लोकांचे कल्याण करणार आहेत का..या भागाचा विकास केवळ नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची महायुती करेल. संसदेत आम्ही वक्फ सुधारणा बोर्ड विधेयक आणले परंतु विरोधक त्याला विरोध करतायेत. कर्नाटकाच्या वक्फ बोर्डाने संपूर्ण गावाला मंदिर, घरे आणि शेतजमिनीसह वक्फची संपत्ती घोषित केले. महाराष्ट्रात आघाडी सरकार आलं तर शेतकऱ्यांच्या जमिनी वक्फ बोर्डाच्या नावावर करण्याचं काम करेल असा आरोप अमित शाहांनी केला.
दरम्यान, प्रभू श्रीराम ५०० वर्ष टेन्टमध्ये होते, ७५ वर्ष काँग्रेस राम मंदिराचा विषय प्रलंबित ठेवला. मोदी आले, भूमिपूजन झाले, मंदिरही बनले. शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी अजून राम मंदिरात गेले नाही. कारण त्यांना व्होटबँकची भीती वाटते. तुष्टीकरणाचं राजकारण राज्यात सुरू आहे. शिराळातील नाग पूजा बंद करण्याचं काम त्यांनी केले. परंपरेने ही नाग पूजा पुन्हा सुरू करण्याचं काम आम्ही करू. शेतकऱ्यांना वर्षाला १५ हजार रुपये देऊ. आघाडीवाले त्यांच्या फिक्स व्होटबँकेला खुश करण्याचं काम करत आहेत असंही अमित शाहांनी म्हटलं.