मतदानाच्या आदल्या दिवशी नालासोपाऱ्यातील हॉटेलमध्ये बविआच्या नेत्यांनी भाजपाचे नेते विनोद तावडेंवर पैसे वाटप करत असल्याचे आरोप करत घेरले होते. हे नाट्य जवळपास दिवसभर सुरु होते. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तावडेंवर टीका केली होती. या प्रकरणात तावडे यांनी कायदेशीर नोटीस पाठवून माफी मागण्याची मागणी केली आहे.
नालासोपाऱ्यातील एका हॉटेलमध्ये तावडे उपस्थित होते. तिथे पैसे वाटप केले जात असल्याचे आरोप करत बविआचे नेते क्षितीज ठाकूर आणि त्यांचे कार्यकर्ते पोहोचले. यावेळी तावडेंच्या आजुबाजुच्या रुममधून दाव्यानुसार १९ लाख रुपये सापडले. तर तावडेंसोबत तेव्हा उपस्थित असलेले अनेक महिला, पुरुष यांना तिथून पोलिसांनी न तपासताच बाहेर काढले होते. तावडे या हॉटेलमध्ये ५ कोटी रुपये वाटण्यासाठी आले होते, असा दावा ठाकुर यांनी केला होता.
पोलिसांनी ही सापडलेली रक्कम ९ लाखांच्या वर असल्याचे म्हटले आहे. यानंतर तावडेंनी ठाकुरांना सोबत घेऊन पत्रकार परिषदही घेण्याचा प्रयत्न केला होता. तसेच ते नंतर हितेंद्र ठाकुरांच्या गाडीतून निघूनही गेले होते. या प्रकरणात तीन गुन्हे दाखल झालेले आहेत. अशातच तावडे यांनी हे पैसे वाटपाचे दावे फेटाळले होते. आता तावडेंनी या प्रकरणात बदनामीचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
तावडे यांनी या कायदेशीर नोटीसबाबत माहिती दिली आहे. मी एका सामान्य मध्यमवर्ग कुटुंबातून आहे. गेल्या ४० वर्षांपासून राजकारणात आहे. परंतू मी कशी असे काही केलेले नाही. काँग्रेसचे नेते मला, पक्षाला आणि माझ्या नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते यामुळे त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर मुद्दामहून खोटे आरोप केले. यामुळे मी त्यांना नोटीस पाठविली असून त्यांनी सार्वजनिक रित्या माफी मागावी किंवा कारवाईला सामोरे यावे, असे यात म्हटले आहे. तावडे यांनी राहुल गांधी, सुप्रिया श्रीनेत, मल्लिकार्जुन खर्गे यांना ही नोटीस पाठविली आहे.