महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होणार आहे. लोकसभेला जी उमेदवार विलंबाने जाहीर करण्याची जी चूक झाली ती पुन्हा नको, अशा तयारीने महायुती कामाला लागली आहे. शिवसेना-भाजपा युती खूप आधीपासूनच होती. परंतू मध्येच त्यात अजित पवार राष्ट्रवादी घेऊन आल्याने तिघाडी निर्माण झाली होती. हा पेच सोडविण्याबरोबच लोकसभेला भाजपाने शिंदे सेना आणि अजित पवारांच्या पक्षाचे सर्व्हेचा हवाला देत पत्ते कापले होते. आता विधानसभेला २८८ पैकी किमान १५० तरी जागा आपण लढणार असल्याचा पवित्रा भाजपाने घेतल्याने या तिन्ही पक्षांत पुन्हा तणाव निर्माण झाला होता. अशातच भाजपाने आपली पहिली यादी तयार केली आहे.
महायुतीच्या मुंबईत आणि दिल्लीत जोरदार बैठका सुरु आहेत. कधी शिंदे दिल्लीला जात आहेत, तर कधी फडणवीस तर कधी अजित पवारांचे दूत दिल्लीत भाजप श्रेष्ठींची भेट घेत आहेत. अशातच २८८ पैकी २३० जागांवर महायुतीत चर्चा झाली असून अद्याप ५८ जागांवर तोडगा निघालेला नाही. या जागा वाटप होताच भाजपा ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे.
भाजपाच्या मुख्यालयामध्ये अमित शाह यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र भाजप कोअर कमिटीची बैठक झाली. यामध्ये जागा वाटप, रणनिती आणि लोकांनी दिलेला फिडबॅक यावर चर्चा झाली. निवडणूक जाहीर होताच भाजपा पहिली लिस्ट जारी करणार आहे. कोअर कमिटीने ५० नावांवर शिक्कामोर्तब केले आहे.
भाजपा १५० ते १६० जागांवर निवडणूक लढणार आहे. २०१९ मध्ये १६२ जागांवर भाजपाने निवडणूक लढविली होती तर त्यापैकी १०५ जागांवर जिंकले होते. आता थोडी परिस्थिती बदललेली आहे. दोन महत्वाचे प्रादेशिक पक्ष फुटलेले आहेत. त्यात तिसरी आघाडी आलेली आहे. ही आघाडी कोणाची मते आपल्याकडे खेचते, मराठा आंदोलन, ओबीसी आंदोलन आदी गोष्टींचा या निवडणुकीवर प्रभाव असणार आहे.