राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 07:10 AM2024-11-08T07:10:41+5:302024-11-08T07:11:57+5:30

Maharashtra Assembly Election 2024: दिवाळीच्या फटाक्यांचे आवाज विरल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील फटाक्यांचे आवाज कानी येत आहेत. प्रचाराला वेग येत आहे. नवनव्या वादांचे बॉम्ब फुटत आहेत.

Maharashtra Assembly Election 2024: Bombshells of political controversies, firecrackers of accusations and counter-accusations in the election campaign, series of new issues and controversial statements. | राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका

राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका

 नागपूर - दिवाळीच्या फटाक्यांचे आवाज विरल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील फटाक्यांचे आवाज कानी येत आहेत. प्रचाराला वेग येत आहे. नवनव्या वादांचे बॉम्ब फुटत आहेत. विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी नागपुरातील सभेत लाल रंगाचे कव्हर असलेल्या संविधानाची प्रत हाती घेऊन भाषण केले. त्यावरून भाजप नेत्यांनी निशाना साधला. त्यावर गुरुवारीही पडसाद उमटले. नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच असून, त्याचेही पडसाद उमटत आहेत. यादरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विदर्भात प्रचार सभांमधून राजकीय हल्ले सुरूच ठेवले आहेत.

नागपूरचा एअरबस प्रकल्प गुजरातला कुणी पळवला?
नागपूर : नागपुरात उद्योग यावेत, येथील बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा, यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे. परंतु, नागपूर येथे होणारा सी-२९५ लष्करी ट्रान्सपोर्ट एअरबस हा प्रकल्प गुजरातला कुणी पळवला. पंतप्रधान एका राज्याच्या हिताची भूमिका घेत आहेत, त्यांना त्या पदावर बसण्याचा अधिकार आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी गुरुवारी येथे केला.

‘महाराष्ट्र को लुटेंगे और दोस्तों को बाटेंगे’ हा भाजपचा अजेंडा
दर्यापूर (जि. अमरावती) : भाजपचा अजेंडा ‘बटेंगे तो कटेंगे’ नव्हे तर ‘हम महाराष्ट्र को लुटेंगे और हमारे दोस्तों को बाटेंगे’, असा आहे. जनभावना या सरकारविरोधात आहे. मविआ सरकार आल्यानंतर पाच वस्तूंच्या किमती स्थिर ठेवू, अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी येथे दिली.

नवा वाद : संविधानाचे कव्हर लाल की निळे?
राहुल गांधी हे पूर्णपणे अर्बन नक्षल्यांच्या अविचाराने घेरले गेले आहेत. त्यामुळेच ते ओरिजिनल निळ्या रंगाऐवजी लाल रंगाचे कव्हर असलेली संविधानाची प्रत ते दाखवत असतात, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केला होता. त्याला गुरुवारी राहुल गांधी यांनी ट्वीट करून उत्तर दिले. त्यांनी लिहिले की, महाराष्ट्राच्या भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांनी म्हटल्यानुसार, बाबासाहेबांचे संविधान दाखवणे आणि जातनिहाय जनगणनेसाठी आवाज उठवणे, हा नक्षलवादी विचार आहे. भाजपचा हा विचार म्हणजे बाबासाहेबांचा अपमान आहे. त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी होतील. लिहून घ्या, जातगणना होईलच. 

आत कोरे कागद, नकली संविधानाची प्रत : रिजिजू
मुंबई : केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू येथे गुरुवारी म्हणाले की, राहुल गांधी यांनी संविधान पुस्तिकेच्या नावाखाली कोरे नोटपॅड दाखविले. निळ्या रंगाऐवजी लाल रंगाचे मुखपृष्ठ घालून आत कोरे कागद असलेल्या नकली संविधानाची प्रत राहुल यांनी नागपुरात नाचवली. 

...याबाबत फडणवीस यांचे काय मत आहे : पृथ्वीराज चव्हाण
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना संविधानाची प्रत देत असतानाचा एक जुना फोटो ट्वीट केला. या फोटोतील संविधानाचे कव्हरदेखील लाल असल्याचे दिसते. ‘फडणवीस यांचे याबाबत काय मत आहे?’ असा प्रश्न त्यांनी विचारला. 

वादग्रस्त वक्तव्यांनी खालावला प्रचाराचा स्तर

अजित पवारांनी सुनावले, खोतांची दिलगिरी
मुंबई : महायुतीचा घटक पक्ष रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन करून कानउघाडणी केली. शरद पवारांबाबत अशी विधाने खपवून घेतली जाणार नाहीत, अशी भूमिका मांडली. त्यानंतर टीकेबद्दल खोत यांनी दिलगिरी व्यक्त केली. ‘ही गावगाड्याची भाषा आहे. भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो’, असे खोत म्हणाले.

सुनील राऊत यांची जीभ घसरली
संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी त्यांच्या विरोधातील शिंदेसेनेच्या सुवर्णा करंजे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले. त्यावर त्यांची उमेदवारीच रद्द करण्याची मागणी विरोधकांनी केली. ‘माझ्यासमोर लढवण्यास कोणी टिकू शकत नाही. तूल्यबळ उमेदवार मिळत नव्हता म्हणून आता कोणाला तरी बकरा बनवलाय. माझ्या गळ्यात बकरी मारलेय. आता २० तारखेला बकरीला कापू’, असे विधान राऊत यांनी केले.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: Bombshells of political controversies, firecrackers of accusations and counter-accusations in the election campaign, series of new issues and controversial statements.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.