दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 07:18 PM2024-11-04T19:18:48+5:302024-11-04T19:27:14+5:30

या सारख्या नावांमुळे मतदारांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : Candidates with the same name in Maharashtra Assembly Election | दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'

दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अनेक बंडखोरांनी आपले अर्ज मागे घेतले, तर काहीजण बंडखोरीवर कायम आहेत. या बंडखोरांमुळे महायुती आणि महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे. बंडखोरांसोबतच सारख्या नावाच्या उमेदवारांमुळेही महायुती आणि मविआचा त्रास वाढणार आहे. काही जागांवर तर सारखे नाव असलेले तीन-तीन अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. या नावांमुळे मतदारांचा गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पर्वती
पुणे जिल्ह्यातील पर्वती जागेवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) महायुतीच्या वतीने माधुरी मिसाळ यांना उमेदवारी दिली आहे, तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीच्या वतीने अश्विनी कदम यांना मैदानात उतरवले आहे. या चुरशीच्या लढतीत अश्विनी कदम नावाच्या तीन अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत.

इंदापूर
पुणे जिल्ह्यातील इंद्रापूर विधानसभेसाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून दत्तात्रेय भरणे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून हर्षवर्धन पाटील निवडणूक रिंगणात आहेत. या जागेवर हर्षवर्धन पाटील नावाचे दोन, तर दत्तात्रेय भरणे नावाचा एक अपक्ष निवडणूक लढवत आहे.

वडगाव शेरी
पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) ने बापूसाहेब तुकाराम पठारे यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवर बापू बबन पठारे नावाच्या व्यक्तीने अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. राष्ट्रवादीच्या (एसपी) उमेदवाराने त्या अपक्ष उमेदवाराचा अर्ज नाकारण्याची मागणीही निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती, मात्र मागणी अमान्य झाली.

दापोली 
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभेच्या जागेवर शिवसेनेच्या दोन गटात लढत आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने योगेश कदम यांना तिकीट दिले आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उबाठा गटातून संजय कदम उमेदवार आहेत. या जागेवर 6 उमेदवारांचे आडनाव कदम आहे. त्यापैकी तीन योगेश कदम आणि तीन संजय कदम नावाचे उमेदवार आहेत.

कोरेगाव 
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभेच्या जागेवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे महेश संभाजीराजे शिंदे आणि राष्ट्रवादीचे (सपा) शशिकांत शिंदे यांच्यात लढत आहे. या जागेवर महेश नावाचे तीन उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. या अपक्षांपैकी महेश माधव शिंदे आणि महेश सखाराम शिंदे अशी दोन अपक्षांची नावे आहेत, तर महेश माधव कांबळे असे एका उमेदवाराचे नाव आहे.

मुक्ताईनगर
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा जागेवर शिवसेनेचे चंद्रकांत पाटील (शिंदे) आणि राष्ट्रवादीच्या रोहिणी एकनाथ खडसे यांच्यात लढत आहे. या जागेसाठी रोहिणी पंडित खडसे आणि रोहिणी गोकुळ खडसे या दोन अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. विशेष म्हणजे, रोहिणी खडसे नावाच्या या दोन्ही महिला उमेदवारांपैकी एकही जळगाव जिल्ह्यातील नाही. एक रोहिणी वाशिम जिल्ह्यातील तर दुसरी अकोल्याची आहे. या जागेवर चंद्रकांत पाटील नावाचेही दोन अपक्ष रिंगणात आहेत.

कर्जत-जामखेड
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभेच्या जागेवर भाजपचे राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्यात लढत आहे. शरद पवार यांच्या घराण्यातून आलेल्या रोहित पवारांच्या उमेदवारीमुळे ही लढत चर्चेत आहे. दरम्यान, कर्जत-जामखेडमध्ये राम शिंदे आणि रोहित पवार नावाच्या दोन अपक्षांनी अर्ज भरला आहे.

तासगाव-कवठे महाकाळ
सांगली जिल्ह्यातील तासगाव-कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादीत लढत आहे. राष्ट्रवादीकडून संजय काका पाटील आणि शरद पवार गटाकडून रोहित पाटील रिंगणात आहेत. तर, या जागेवर रोहित पाटील नावाच्या तीन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. तसेच, संजय पाटील नावाच्या व्यक्तीनेही अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.

इस्लामपूर 
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने निशिकांत पाटील, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने जयंत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवर निशिकांत पाटील आणि जयंत पाटील नावाचे प्रत्येकी दोन अपक्षही रिंगणात आहेत.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 : Candidates with the same name in Maharashtra Assembly Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.