विधानसभा निडणुकीच्या प्रचारासाठी वणी येथे गेलेले शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडील बॅगांची तपासणी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी केल्याचं प्रकरण चांगलंच तापलं आहे. या घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये उद्धव ठाकरे हे निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांवर चांगलेच संतप्त झाल्याचे दिसत होते. दरम्यान, सोमवारी झालेल्या प्रचारसभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी या घटनेवरून निवडणूक आयोगासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावरही जोरदार टीका केली. तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या बॅगा येताना तर तपासाच, पण जातानाही तपासा, कारण ते महाराष्ट्र लुटून गुजरातमध्ये नेत आहेत, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
वणी येथे हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर सोबत आणलेल्या बॅगांची तपासणी केल्याने संतप्त झालेल्या उद्धव ठाकरे यांनी प्रचारसभेमध्ये निवडणूक आयोग आणि भाजपावर टीका केली. ते म्हणाले की, यांच्या बॅगा इकडे येताना तर तपासाच, पण महाराष्ट्रातून जाताना जास्त तपासा, कारण महाराष्ट्र लुटून ते गुजरातला नेत आहेत. त्यामुळे जाताना त्यांची बॅग तपासा. अगदी खिसे, पाकीट सगळं तपासा. काय चाललंय काय? तुम्ही हम करे सो कायदा आणि आम्ही काय गांडूळ बनून, असेच बसलोय का? अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, सोमवारी उद्धव ठाकरे यांची वणी येथे सभा झाली. या सभेसाठी ठाकरे हेलिकॉप्टरने गेले होते, यावेळी हेलिपॉडवर उतरताच ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांची बॅग निवडणूक अधिकाऱ्यांना तपासल्याचे समोर आले आहे. दरम्यान, यानंतर सभेत उद्धव ठाकरे संतापल्याचे पाहायला मिळाले. तसेच अधिकाऱ्यांचा झाडाझडती घेत तुम्ही कधी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी यांच्या बॅगा तपासल्या का? अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे केली होती.