मुंबई - साकीनाका येथील सभा संपवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जात असताना त्यांचा ताफा संतोष कटके नावाच्या तरुणानं अडवला. काळे झेंडे दाखवून या तरुणाने मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरले. त्याने मुख्यमंत्र्यांच्या कार फटकाही मारला. या प्रकारामुळे संतप्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताफा थांबवला आणि स्वत: गाडीतून खाली उतरले. महाविकास आघाडीचे उमेदवार नसिम खान यांच्या कार्यालयासमोर ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
या प्रकारामुळे एकनाथ शिंदे चांगलेच संतापले होते. त्यांनी कारमधून खाली उतरत महाविकास आघाडीच्या कार्यालयात गेले. त्याठिकाणी कार्यकर्त्यांना जाब विचारला. कार्यकर्त्यांना तुम्ही असंच शिकवता का असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारला. या प्रकारातील संतोष कटके नावाच्या तरुणाला मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षारक्षकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर कटके कुटुंबियांसह मविआ कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या मांडला. मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणारा तरुण आज ठाकरे गटात
साकीनाका येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवणारा तरूण आणि त्याच्या वडिलांनी आज मातोश्रीवर जात ठाकरे गटात प्रवेश केला आहे. संतोष कटके आणि त्याचे वडील साधू कटके यांनी ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केला आहे. साधू कटके हे आठवले गटाचे पदाधिकारी होते. मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे आणि अपशब्द बोलल्याचा आरोप असणाऱ्या या तरुणाचं उद्धव ठाकरेंनी कौतुक केले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाहिल्यानंतर माझ्यातील कडवट शिवसैनिक जागरुक झाला आणि मी घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी मला ताब्यात घेऊन काही वेळाने सोडून दिले असं या तरूणाने म्हटलं आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देतानाही या तरुणाने मुख्यंमंत्री शिंदेंविरोधात अपशब्द वापरले. मात्र या प्रकारामुळे आगामी काळात शिंदे आणि ठाकरे यांच्या शिवसैनिकांमध्ये अधिक संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.