मुंबई - मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी ‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या राज्यस्तरीय अभियानाची सुरूवात शुक्रवारी गेट वे ऑफ इंडिया येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. या अभियानांतर्गत मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृतीचे विविधांगी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यावेळी ‘ये पुढे मतदान कर’ या महाराष्ट्र मतदान गीताचे लोकार्पण करण्यात आले.
केंद्रीय निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक आयुक्त हिरदेश कुमार, मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, मुंबई उपनगर जिल्हा व शहर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे सदिच्छा दूत श्रीगौरी सावंत आणि दिव्यांग मतदार सदिच्छा दूत नीलेश सिंगीत, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, अभिनेत्री वर्षा उसगावकर, मतदार गीताचे गायक मिलिंद इंगळे, दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेत्री अनन्या पांडे, हास्य कलाकार भारती सिंग, हर्ष लिंबाचिया, गायक राहुल सक्सेना, रॅपर सुबोध जाधव, अभिनेते मनोज जोशी, अभिनेत्री सोनाली खरे, अभिनेता अली असगर यांच्यासह विविध नामवंत कलाकार, अभिनेते तसेच मान्यवर यावेळी उपस्थित होते. मतदानाचा अधिकार प्रत्येकाने बजावलाच पाहिजे, असे आवाहन मान्यवरांनी यावेळी केले.
समुद्रातील बोटींवरही विद्युत रोषणाई- मुंबई पोलिस दलाच्या वाद्यवृंद पथकाचे विशेष सादरीकरण तसेच डाक कार्यालयाने निवडणूकविषयक तयार केलेल्या डाक तिकिटाचे अनावरणही यावेळी करण्यात आले. नवमतदारांसह उपस्थित सर्वांना समारंभपूर्वक मतदान करण्याची शपथही देण्यात आली. - मतदार जागृती व्हॅनचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. जनजागृतीचा संदेश देणारी विद्युत रोषणाई समुद्रातील बोटींवर करण्यात आली होती. या कार्यक्रमानंतर गेट वे ऑफ इंडिया ते कुलाब्याच्या निवासी ठिकाणापर्यंत विशेष मतदार जागृती रॅली काढली.