कोल्हापूर उत्तर मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शेवटच्या क्षणी मविआ उमेदवाराने अर्ज घेतला मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 03:14 PM2024-11-04T15:14:35+5:302024-11-04T15:24:33+5:30
कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराने माघार घेतल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. याठिकाणी काँग्रेसनं उमेदवारी दिलेल्या मधुरिमाराजे यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला आहे. राजेश लाटकर यांनी कोल्हापूर उत्तरमध्ये अपक्ष अर्ज भरला होता. लाटकर उमेदवारी मागे घेण्यास तयार नाहीत त्यामुळे अधिकृत उमेदवार असलेल्या मधुरिमाराजे यांनाच अर्ज मागे घ्यावा लागला आहे. कोल्हापूरात या घडामोडीमुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अधिकृत उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने मविआला याठिकाणी अपक्षाला पाठिंबा द्यावा लागणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून राजेश लाटकर यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते. खासदार छत्रपती शाहू, सतेज पाटील यांनी लाटकरांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र मधुरिमा राजे यांनी शेवटच्या क्षणाला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने कोल्हापूरात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली होती. परंतु त्यानंतर या उमेदवारीत बदल करून मधुरिमाराजे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यामुळे लाटकर नाराज झाले होते. राजेश लाटकर यांनी या मतदारसंघात अपक्ष अर्ज दाखल केला.
काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य
राजेश लाटकर यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी विरोध केला होता. यानंतर अवघ्या काही तासांत त्यांची उमेदवारी रद्द करून काँग्रेसकडून मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली होती. यानंतर लाटकर समर्थकांमध्ये नाराजी पसरली होती. नेते मंडळींनी लाटकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही राजेश लाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज उमेदवारी माघार घेण्याचा शेवटचा दिवस असताना शेवटच्या १० मिनिटांपूर्वी मधुरिमाराजे यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे काँग्रेसला धक्का बसला.
दरम्यान, रविवारी छत्रपती कुटुंबियांकडून राजेश लाटकर यांची भेट घेऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यावेळी राजेश लाटकर यांनी षड्यंत्र रचून आपली उमेदवारी रद्द करण्यात आल्याचा थेट आरोप खासदार शाहू छत्रपती यांच्यासमोर केला होता.