विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 06:58 PM2024-09-27T18:58:37+5:302024-09-27T18:59:53+5:30
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभेच्या निवडणुका पारदर्शक व निष्पक्षपातीपणे पार पडण्यासाठी रश्मी शुक्ला यांच्यासह वादग्रस्त व सत्ताधारी पक्षाला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना हटवावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
मुंबई - विधानसभेच्या निवडणुका निष्पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी वादग्रस्त व सरकारी पक्षाला मदत करणारे अधिकारी हटवले पाहिजेत. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुल्का यांची कारकीर्द संशयास्पद व वादग्रस्त आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावणे, विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग करणे यासारखे प्रकार त्यांनी केले असून त्यांच्यावर गुन्हेही दाखल झालेले आहेत. निवडणुका पारदर्शक व निष्पक्षपातीपणे पार पडण्यासाठी रश्मी शुक्ला यांच्यासह वादग्रस्त व सत्ताधारी पक्षाला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना हटवावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली या शिष्टमंडळात प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मुनाफ हकीम आणि डॉ. गजानन देसाई यांचा समावेश होता. त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी २४ सप्टेंबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठवलेल्या पत्राची प्रत आज पुन्हा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे सुपूर्द केली व पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली.
यासंदर्भात टिळक भवन मध्ये पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, रश्मी शुक्ला यांची सेवा समाप्त झाली असतानाही भाजपा युती सरकारने त्यांना दोन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. त्या भाजपा युती सरकारला अनुकुल अशी भूमिका घेऊन मदत करत असतात, असे वादग्रस्त व संशयास्पद अधिकारी निवडणूक काळात नसावेत, अन्यथा निवडणूक निष्पक्ष होणार नाही. अशी मागणी काँग्रेसने केली असून निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. मंत्रालयातील गृहमंत्र्यांच्या कार्यालयाची एका महिलेने तोडफोड केली व गृहमंत्र्यांच्या नावाच्या पाटीची तोडफोडही केली. राज्याचा गृहमंत्रीच सुरक्षित नाही तर राज्यातील जनता कशी सुरक्षित असेल असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला.
भाजपा युती सरकारने विकासाच्या नावावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली आहे, विकास कुठेच दिसत नाही पण निवडणुकीच्या तोंडावर जनतेमध्ये सरकारची स्वच्छ व विकास केल्याची प्रतिमा मीडियातून दाखवण्यासाठी एका आयएएस अधिकाऱ्यामार्फत मीडियाच्या प्रमुख व्यक्तींना बोलावून टार्गेट दिले जात आहे. यासाठी एमएसआरडीसी, एमएमआरडीए, म्हाडा, सीडको, प्रदुषण महामंडळ, एसआरए यांचा पैसा वापरला जात आहे. राज्य सरकारच्या विविध महामंडळावर हजारो कोटींचे कर्ज आहे. महामंडळे ५० हजार कोटी रुपये तोट्यात आहेत हे कॅगच्या अहवालातून समोर आले आहे. सरकारकडे पैसे नसताना या महामंडळाचा पैसा वापरून कोट्यवधींची उधळपट्टी सुरु आहे, असेही नाना पटोले म्हणाले.