Maharashtra Assembly Election 2024 : जागा वाटपात काँग्रेस अजिबातही बॅकफूटवर गेलेली नाही. आम्ही आघाडी धर्म पाळत समन्वयवादी व समंजस भूमिकेत राहिलो. आम्ही मुक्त चर्चेतून जागा वाटप केले. महायुतीत असे मुक्त वातावरण नव्हते. तेथे जागा वाटपातही भाजपचा मित्रांना धाक आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. ‘लोकमत’च्या अहिल्यानगर आवृत्तीचे निवासी संपादक सुधीर लंके यांनी घेतलेल्या या विशेष मुलाखतीत थोरात यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
प्रश्न: नाना पटोले, संजय राऊत यांच्यातील वाद तुम्ही कसा मिटविला? उत्तर: पक्षश्रेष्ठींनी आघाडीत अनुकूल वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली होती. उद्धव ठाकरे, शरद पवार हे जागा वाटपाच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे बैठकांत काय होतेय?, कसे पुढे गेले पाहिजे?, याबाबत मी ठाकरे व पवारांसोबत बोलून अनुकूल मार्ग काढत होतो. पटोले व राऊत जागांबाबत आग्रही, आक्रमक असायचे. पण त्यांची भूमिका पक्षासाठीच व तत्कालिक होती. चर्चेनंतर हे वाद शमले.
प्रश्न: विधानसभेच्या जागा वाटपात काँग्रेसला बॅकफूटवर जावे लागले का? उत्तर: हे पहा, आमची महाविकास आघाडी आहे. काँग्रेस एकटी होती तेव्हा २८८ जागा लढलो. राष्ट्रवादीसोबत १४७ जागा लढलो. आता तीन पक्ष आहोत. तेव्हा तीन हिस्से पडणारच. चार-दहा जागा आम्हाला जास्त मिळतील. पण, सगळेच आम्हाला कसे मिळेल?, काही जागांवर मित्र पक्षांचीही ताकद असते. पण, एकमेकांना सांभाळल्याशिवाय आघाडीत पर्याय नसतो. महायुतीतही हेच आहे.
प्रश्न: पण काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रीय पक्ष म्हणून भाजप जास्त जागा लढवतोय? उत्तर: त्यांची व आमची तुलना कशी होईल?, आम्ही मुक्त वातावरणात जागा वाटपाची चर्चा केली. तिकडे मुक्त वातावरण आहे का?, तेथे मित्र पक्षांना धाक आहे. त्यांना भाजपचे गपगुमान ऐकावे लागते. स्वाक्षऱ्या करा म्हटले की कराव्या लागतात.
प्रश्न: आघाडीच्या जागा वाटपावर राहुल गांधी का रागावले होते? उत्तर: ते बिलकुल रागावलेले नाहीत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मी, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील आम्ही समन्वयाने जागांबाबत निर्णय घेतले. सर्व जागांवर कार्यकर्त्यांचे समाधान होऊ शकत नाही. काही पक्षश्रेष्ठींकडे जागांच्या मागणीबाबत निवेदन पाठवतात. त्याबाबत श्रेष्ठी आम्हाला विचारणा करणार हे स्वाभाविक आहे.
प्रश्न: उद्धवसेनेबाबतचा तुमचा अनुभव?उत्तर: शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वतंत्र कार्यशैलीचा वारसा आहे. आमची व त्यांची संस्कृती, कार्यशैली वेगळी आहे. पण, त्यांची भूमिका ही समाजाला मदत करण्याची, प्रस्थापितांविरोधात लढण्याचीच आहे. जात, धर्म याच्याबाहेर जावून ते काम करतात. ही भूमिका काँग्रेसला पूरकच ठरते.
प्रश्न: काँग्रेसला शरद पवार, उद्धव ठाकरे यांपैकी कोणाशी चर्चा करणे सोपे जाते? उत्तर: खरे सांगतो, तुम्ही प्रामाणिक असाल तर समोरचे तुमच्यावर संशय घेत नाहीत. मी डावपेच खेळत नाही यावर या दोघांचाही विश्वास आहे. काँग्रेसची विचारधारा हाच माझ्या चर्चेचा अजेंडा असतो हे त्यांना स्पष्ट माहीत आहे. त्यामुळे मला तरी दोघांशीही संवाद साधणे सोपे जाते.
प्रश्न: लोकसभा निवडणुकीत संविधान बदलावरून तुम्ही भाजपवर टीका केली. आता प्रचाराचा मुद्दा काय? उत्तर: तोच. जोवर भाजप आहे तोवर संविधानाचा मुद्दा संपत नाही हे लिहून घ्या. कारण हा पक्ष चातुर्वर्ण्य, मनुवादाचा समर्थक आहे. त्यांच्याबद्दल शंका असणारच. ते समोर वेगळे चेहरे करतील. पण त्यांचे थिंक टँक ठरलेले आहेत. ते पक्ष फोडून, धाक दाखवून सरकार बनवतात. त्यांनी खोके सरकार आणले. ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला व अजित पवारांना सत्तेत घेतले. पक्षांतर बंदी कायदा मोडला. सर्रास भ्रष्टाचार सुरू आहे. निवडणुकीत पैशांचा वापर होतोय. हे सर्व मुद्दे प्रचारात राहतील.
प्रश्न: ‘लाडकी बहीण’ योजनेचा निवडणुकीवर काय परिणाम होईल? उत्तर: यांना बहीण नव्हे सत्ता लाडकी आहे. मतांसाठी योजना आणली हे बहिणींना ठाऊक आहे. सरकारी खर्चाने हे पक्षांचा प्रचार करताहेत. अंगणवाडी सेविकांना गुलामाप्रमाणे बळजबरी सभांना बसवले. त्यामुळे बहिणी चिडलेल्या आहेत.
प्रश्न: महाविकास आघाडी ही योजना बंद करेल, असा महायुतीचा आरोप आहे.उत्तर: हे पहा, गोरगरिबांसाठी योजना आणण्याचा पायंडा काँग्रेसनेच पाडला. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना कुणी आणली?, कोरोनाच्या काळात राहुल गांधी यांनीच सांगितले होती की, गरिबांना मदत करणारी योजना हवी. त्यामुळे आम्ही योजना कशाला बंद करू? उलट चांगल्या पद्धतीने काय करता येईल ते ठरवू.
प्रश्न: ‘वंचित’, परिवर्तन महाशक्ती यांचा मविआला फटका बसेल? उत्तर: त्यासाठीच तर भाजपने हा कावेबाजपणा केलाय. आघाडी सोडून इतरांना जे मतदान होईल ते भाजपला फायदेशीर आहे. ही तिसरी, चौथी आघाडी निवडून येणार नाही. केवळ आघाडीची मते कमी करण्यासाठी हे उद्योग आहेत.
प्रश्न: जरांगे पाटील यांनीही लढण्याची, पाडण्याची भूमिका घेतलीय?उत्तर: त्यांच्या आंदोलनाचा परिणाम निश्चित आहे. पण, जरांगे यांच्या मांडणीतून हे जाणवते की त्यांचा भाजपच्या तत्वज्ञानाला सतत विरोध दिसतो. त्यामुळे भाजपला ताकद मिळेल असे ते काही करणार नाही असे वाटते.
प्रश्न: आरक्षणाचे प्रश्न तुम्ही कसे निकाली काढणार?उत्तर: काँग्रेसची ही मागणी आहे की जातनिहाय सर्वेक्षण करुन ज्याचा त्याचा वाटा प्रत्येक जातीला द्या. पण, सर्वेक्षणावर सत्ताधारी काही बोलत नाहीत.
प्रश्न: विखे पिता-पुत्रांनी तुमच्या मतदारसंघात मोहीम का उघडली आहे? उत्तर: आमच्यात पूर्वीपासून वैचारिक मतभेद आहेत. पण, मी समन्वयवादी होतो. एकमेकांच्या तालुक्यात समन्वय पाळून होतो. तो ठेवावा लागतो. भाजप सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर विखे यांनी संगमनेर तालुक्यातील जनतेला अकारण त्रास दिला. मी त्यांच्या मतदारसंघात जाऊन जनतेच्या आग्रहाखातर गणेश सहकारी साखर कारखाना, बाजार समितीत पॅनल दिले. तेथे आम्हाला विजय मिळाला. लोकसभेत सुजय विखे पडले. हे त्यांना सहन होत नाही. म्हणून ते राग काढताहेत. माझी मुलगी जयश्रीबद्दल अभद्र बोलण्यापर्यंत खाली घसरलेत. जनता त्यांना मतांतून उत्तर देईल.