रामटेक - विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्षाचं चित्र रामटेक मतदारसंघात पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिलेल्या उमेदवाराविरोधात काँग्रेस बंडखोराला स्थानिक नेते जाहीरपणे पाठिंबा देत आहेत. अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक यांच्या प्रचारासाठी काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वे आणि माजी मंत्री सुनील केदार गावोगावी फिरत आहेत. मुळक यांना का पाठिंबा दिला याबाबत सुनील केदार यांनी पहिल्यांदाच खुलासा केला आहे.
राजेंद्र मुळक यांच्या प्रचारसभेत सुनील केदार म्हणाले की, उद्धवजी, आम्ही एवढे सांगतो, ज्या माणसाने तुमचे मीठ खाल्ले, तुमचा जो अपमान केलेला आहे. त्या माणसाला त्याची जागा दाखवण्यासाठी आम्ही ही भूमिका घेतली आहे. आशिष जैस्वाल यांनी उद्धव ठाकरेंची गद्दारी केली त्या अपमानाचा बदला आम्ही घेऊ. मी आणि श्यामकुमार बर्वे यांनी बसून निर्णय घेतला. आशिष जैस्वाल यांना सत्तेचा माज आला आहे असं त्यांनी म्हटलं.
तर स्वत: उद्धव ठाकरेंसमोर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतात, आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणू. ते अनेकदा उद्धव ठाकरेंकडे गेले त्यांना नाकारले गेले. उद्धव ठाकरेंची शिवसेना त्यांना संपुष्टात आणायची होती. आम्ही जेव्हा उद्धव ठाकरेंसोबत होतो तेव्हाही ते अशीच वागणूक आम्हाला द्यायचे. मंत्री असताना आमचा अवमान करायचे म्हणून आम्ही बाहेर पडलो. उद्धव ठाकरेंची फसवणूक सुनील केदार करतायेत. ठाकरेंचे संपर्कप्रमुख भास्कर जाधव यांनी केदारांना उघड केले. मतदारसंघात त्यांची प्रतिमा मलिन झाली. त्यामुळे स्वत:ची अब्रू वाचवण्यासाठी अशाप्रकारे विधाने करतायेत. गेलेली अब्रू वाचवण्यासाठी सुनील केदारांचा हा केविळवाणा प्रयत्न आहे असा टोला महायुतीचे शिवसेना उमेदवार आशिष जैस्वाल यांनी केदारांना लगावला.
दरम्यान, दुसऱ्याच्या काठीने विंचू मारावा एवढी शिवसेना कमकुवत झाली नाही. सुनील केदार यांनी रामटेकमध्ये गद्दारी केली आहे. माझ्याकडे पूर्व विदर्भातील २८ जागांचे कार्यक्षेत्र आहे. तिथे आम्ही १ जागा घेतली तिथे तुम्ही तुमचा बंडखोर उभा करता. त्याच्या व्यासपीठावर तुम्ही जाता ही गद्दारी नाही? उद्धव ठाकरेंना तुम्ही कोणती मदत करताय, सुनील केदार पाहुण्याच्या काठीने विंचू आम्ही मारत नाही. मारूतीच्या बेंबीत बसलेला सुनील केदार हा विंचू आहे हे शिवसेनेने ओळखावे. इतका विश्वासघात कुठल्याही मित्रपक्षाने आघाडीत करू नये. सरळ सरळ विश्वासघात आहे अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी काँग्रेस नेते सुनील केदार यांच्यावर हल्लाबोल केला.