सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 06:21 PM2024-11-02T18:21:27+5:302024-11-02T18:23:17+5:30
हिंगण्यात बोढारे, नागपुरे तर उमरेडमध्ये सुटे रिंगणात, रामटेकमध्ये मुळक यांना समर्थन
नागपूर - काँग्रेस नेते सुनील केदार यांचे समर्थक असलेले जि.प.चे समाज कल्याण सभापती मिलिंद सुटे यांनी उमरेड मतदारसंघात, तर जि.प. सदस्य उज्ज्वला बोढारे व वृंदा नागपुरे यांनी हिंगणा मतदारसंघात बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. रामटेकमध्ये अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनाही केदार यांनी समर्थन दिले आहे. केदार यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत संताप व्यक्त केला जात आहे.
हिंगणा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचण्यासाठी सुनील केदार यांनी खूप प्रयत्न केले. पण शेवटी हा मतदारसंघ शरद पवार गटासाठीच सोडण्यात आला. केदार यांना पवार गटाकडून जि.प. सदस्य उज्ज्वला बोढारे किंवा जि.प. सदस्य वृंदा नागपुरे यांची उमेदवारी अपेक्षित होती. पण शरद पवार यांनी या मतदारसंघाचे तीन वेळा नेतृत्व करणारे माजी मंत्री रमेश बंग यांना उमेदवारी दिली. उमरेड मतदारसंघात केदार यांना काँग्रेसडून माजी नगरसेविका दर्शनी धवड किंवा जि.प.चे समाज कल्याण सभापती मिलिंद सुटे यांना उमेदवारी अपेक्षित होती, पण हायकमांडने संजय मेश्राम यांना पुन्हा संधी दिली.
रामटेकमध्येही उद्धव सेनेचे उमेदवार विशाल बरबटे यांच्याजागी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुळक यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी केदार यांनी दोनदा मुंबईत मातोश्री गाठली. पण काहीच साध्य झाले नाही. समर्थकांना तिकीट मिळाल्यामुळे केदार चांगलेच दुखावले. सोमवारी सायंकाळी त्यांनी समर्थकांची बैठक घेत रामटेकमध्ये राजेंद्र मुळक अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करतील असे जाहीर केले होते. हिंगणा व उमरेडच्या उमेदवारीवरही त्यांनी नाराजी केली होती. त्यानुसार मंगळवारी तीनही मतदारसंघात त्यांच्या समर्थकांनी बंडाचा झेंडा रोवत उमेदवारी अर्ज दाखल केले.
सावनेरमध्ये अपक्ष का नाहीत?
केदार यांनी महाविकास आघाडीच्या जागा अडचणीत आणण्यासाठी समर्थकांना बंडखोर म्हणून रिंगणात उतरविले आहे. दुसरीकडे सावनेर मतदारसंघात त्यांच्या जागेवर पत्नी अनुत्ता केदार या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आहेत. केदार यांना अपक्षांचे एवढे प्रेम आहे तर त्यांनी सावनेरमध्ये काँग्रेसची उमेदवारी का घेतली, अपक्ष म्हणूनच निवडणूक का लढविली नाही. असा प्रश्न महाविकास आघाडीतील उमेदवारांचे समर्थक विचारू लागले आहेत.