मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. अशात महाराष्ट्रातकाँग्रेस सत्तेत आल्यास कुटुंबातील एकाच महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल. मात्र, महाराष्ट्रात महायुतीचे सरकार एकाच घरात ३ महिला असतील तरी सर्वांना पैसे देतंय, असे भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी म्हटले आहे. याबाबत चित्रा वाघ यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे.
"कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमधील महिला आणि बालविकास मंत्री स्वतः कबूल करतात की कर्नाटकात गृहलक्ष्मी योजनेचा (लाडकी बहीण योजनेसारखी) काँग्रेस एका ‘कुटुंबातील फक्त एकाच महिलेला’ लाभ देत आहे. म्हणजे सासू, सून आणि नणंद पैकी एकालाच लाभ द्यायचा आणि कुटुंबातील महिलांमध्ये वाद विवाद आणि स्पर्धा निर्माण करण्याचीच ही काँग्रेसची योजना आहे", असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.
दरम्यान, महायुती सरकारने राज्यात सुरु केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना विरोधकांच्या डोळ्यात खुपत असल्याचा आरोप यापूर्वी चित्रा वाघ यांनी केला होता. लाडकी बहीण योजनेमुळे अनेक महिलांना सक्षम होत असून त्यांना छोट्या- मोठ्या व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध करुन दिले असल्याचे त्यांनी म्हटले होते.
अशातच आता महाराष्ट्रातील महायुती सरकारची लाडकी बहीण योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक आदर्श योजना ठरली आहे. या योजनेच्या तुलनेत, कर्नाटकातील काँग्रेस सरकारने सुरू केलेली गृहलक्ष्मी योजना एका घरातील फक्त एका महिलेलाच लाभ देण्याच्या मर्यादेमुळे टीकेचा विषय ठरली आहे, असे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.