विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 07:41 PM2024-09-30T19:41:43+5:302024-09-30T19:43:17+5:30
Maharashtra Assembly Election 2024, Congress Plan: १० ऑक्टोबरला यादी जवळपास अंतिम होण्याची शक्यता
Maharashtra Assembly Election 2024, Congress Plan: महाराष्ट्रात सध्या एका गोष्टीची राजकीय पक्षांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. ती गोष्ट म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या तारखा. केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी राज्याचा दौरा केला आणि विविध ११ राजकीय पक्षांशी चर्चा केली. त्यानंतर आयोगाची पत्रकार परिषद झाली असून काही दिवसांतच तारखांची घोषणा केली जाईल. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच राज्याच विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपला सर्वोत्तम उमेदवार रिंगणात उतरवेल. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनीही, या निवडणुकीसाठी उमेदवार कसा निवडला जावा, यासाठी खास मास्टरप्लॅन तयार केला आहे.
विधानसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीची तयारी म्हणून काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उद्यापासून (१ ऑक्टोबर) घेतल्या जाणार आहेत. ज्येष्ठ नेत्यांवर या मुलाखतीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे नेते आपल्याला नेमून दिलेल्या जिल्ह्यात जाऊन मुलाखती घेऊन आपला अहवाल देणार आहेत.
एकूण १६८८ अर्ज दाखल
विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविले होते. याला भरपूर प्रतिसाद मिळाला असून काँग्रेस पक्षाकडे एकूण १६८८ इच्छुकांनी उमेदवारी मागितलेली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींसाठी काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पुणे शहर व पुणे ग्रामीण, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्याकडे नागपूर शहर व ग्रामीण, खा. चंद्रकांत हंडोरे यांच्याकडे ठाणे जिल्हा, खा. प्रणिती शिंदे यांच्याकडे सांगली व सातारा जिल्हा, मुजफ्फर हुसेन यांच्याकडे अहमदनगर आ. कुणाल पाटील यांच्याकडे नाशिक, माजी मंत्री विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्याकडे मुंबई शहर, अमित देशमुख यांच्याकडे सोलापूर व कोल्हापूर, डॉ. नितीन राऊत यांच्याकडे वर्धा व यवतमाळ, यशोमती ठाकूर यांच्याकडे परभणी व हिंगोली, डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडे नांदेड, प्रा. वसंत पुरके यांच्याकडे अकोला, खा. नामदेव किरसान यांच्याकडे वाशीम, खा. डॉ. कल्याण काळे यांच्याकडे लातूर व बीड, खा. डॉ. शोभा बच्छाव यांच्याकडे जालना, आ. संग्राम थोपटे यांच्याकडे मुंबई उपनगर, डॉ. वजाहत मिर्झा यांच्याकडे संभाजीनगर, एम.एम. शेख यांच्याकडे धाराशिव, हुसेन दलवाई यांच्याकडे पालघर, शिवाजीराव मोघे यांच्याकडे धुळे व नंदुरबार, सुरेश शेट्टी यांच्याकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड, आ. अभिजीत वंजारी चंद्रपूर व गडचिरोली, सतीश चतुर्वेदी भंडारा व गोंदिया, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांच्याकडे बुलढाणा व अमरावती, ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते १ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत आपल्याला नेमून दिलेल्या जिल्ह्यात जाऊन इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. १० ऑक्टोबरपर्यंत त्यांचा गोपनीय अहवाल प्रदेश काँग्रेसला सादर केला जाणार आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली.