काँग्रेसकडून भाजपाला धक्का, दोन माजी आमदारांचा कांग्रेसमध्ये प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 12:55 PM2024-10-15T12:55:40+5:302024-10-15T12:56:56+5:30
Maharashtra Assembly Election 2024: भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार व बुलढाणा जिल्ह्याचे माजी अध्यक्ष धृपदराव सावळे आणि नांदेड जिल्ह्यातील मुखेड देगलूर मतदार संघाचे भाजपाचे माजी आमदार अविनाश घाटे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
मुंबई - विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपामधून मोठ्या प्रमाणावर आऊटगोईंग सुरू झालं आहे, तर काँग्रेस पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दररोज वाढत आहे. दरम्यान, सोमवारी भाजपाच्या दोन माजी आमदारांना पक्षात घेत काँग्रेसने भाजपाला मोठा धक्का दिला आहे. सोमवारी टिळक भवनमध्ये प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार व बुलढाणा जिल्ह्याचे माजी अध्यक्ष धृपदराव सावळे आणि नांदेड जिल्ह्यातील मुखेड देगलूर मतदार संघाचे भाजपाचे माजी आमदार अविनाश घाटे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
भाजपाचे माजी आमदार असलेले धृपदराव साळवे आणि अविनाश घाटे यांच्यासह मनसेचे राज्य उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार, राज्य ग्राहक सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कमाल फारुखी, प्रवक्ते उमर फारुखी, अकोला जिल्ह्यातील वंचितचे डॉ. रहेमान खान, बाळापूरचे माजी नगराध्यक्ष जम्मूसेठ यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी नाना पटोले म्हणाले की, राज्यातील भाजपा शिंदे सरकारच्या भ्रष्ट कारभाराला जनता कंटाळली आहे. महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली असून शेतकरी, कामगार यांचे प्रचंड हाल होत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, महागाईने जगणे कठीण झाले आहे परंतु राज्यातील युती सरकार जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही. काँग्रेस पक्षाची विचारधाराच देशाला तारणारी असून राहुल गांधी यांची देश जोडणारी भूमिका सर्वात महत्वाची आहे. लोकसभा निवडणुकी प्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही राज्यात काँग्रेस पक्षच सर्वात मोठा पक्ष म्हणून विजयी होईल असा विश्वास व्यक्त करून काँग्रेसची विचारधारा तळागाळात पोहचवा असे आवाहन नाना पटोले यांनी यावेळी केली.
या कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.