मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. या निवडणुकीत विविध पक्षाच्या अनेक नेत्यांनी बंडखोरी केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा नेत्यांवर पक्षांकडून कारवाई करण्यात येत आहे. काँग्रेसनं रविवारी बंडखोरी करत विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या १६ उमेदवारांची ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरून पक्षाने बंडखोरांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे.
काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या १६ बंडखोर उमेदवारांना सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. यात रामटेक विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र मुळक, काटोलमधून काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवल्क्य जिचकार, कसबा विधानसभा मतदारसंघातून कमल व्यवहारे यांच्यासह १६ जणांना ६ वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.
बंडखोरांवर कडक कारवाई केली जाईल, असे काँग्रेसने गेल्या काही दिवसांपूर्वी सांगितले होते. त्यानुसार, ही कारवाई केली जात आहे. तर दुसरीकडे भाजपने सुद्धा गेल्या मंगळवारी ३७ विधानसभा मतदारसंघातील ४० बंडखोर नेते आणि पदाधिकाऱ्यांवर कारवाई करत पक्षातून हकालपट्टी केली आहे. दरम्यान, राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.