काँग्रेसने बंडखोर उमेदवारांबाबत घेतला मोठा निर्णय, रमेश चेन्निथला यांनी केली महत्त्वाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 12:23 PM2024-10-30T12:23:36+5:302024-10-30T12:24:30+5:30

Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडीमधील मतभेद मिटवून ऐक्य टिकवण्यासाठी काँग्रेसने बंडखोर उमेदवारांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

Maharashtra Assembly Election 2024: Congress took a big decision regarding rebel candidates, Ramesh Chennithala made an important announcement | काँग्रेसने बंडखोर उमेदवारांबाबत घेतला मोठा निर्णय, रमेश चेन्निथला यांनी केली महत्त्वाची घोषणा

काँग्रेसने बंडखोर उमेदवारांबाबत घेतला मोठा निर्णय, रमेश चेन्निथला यांनी केली महत्त्वाची घोषणा

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा सुटला नव्हता. दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये अनेक मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. त्यात काँग्रेसकडूनही अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीमधील मतभेद मिटवून ऐक्य टिकवण्यासाठी काँग्रेसने बंडखोर उमेदवारांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीमध्ये कुठलीही मैत्रिपूर्ण लढत होणार नाही, पक्षाच्या अधिकृत उमेदवारीशिवाय ज्यांनी कुठे उमेदवारी अर्ज भरले असतील त्यांनी ते मागे घेतले पाहिजेत, असे स्पष्ट आदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी काँग्रेसच्या बंडखोरांना दिले आहे.

महाविकास आघाडीच्या सगळ्या २८८ उमेदवारांचे अर्ज काल दाखल झाले आहेत. महाविकास आघाडी एकसाथ मजबुतीने निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाली आहे. मविआचे सर्व उमेदवार आता जनतेमध्ये आहेत. महायुतीशी तुलना केल्यास महाविकास आघाडीमध्ये कुठलेही मतभेद नाही आहेत. महायुतीमध्ये आपापसात भयंकर भांडणं सुरू आहेत. भाजपाचे नेते शिंदे आणि अजित पवार गटातून लढत आहेत. असं मी कधी पाहिलेलं नाही. महायुती ही एक विचित्र आघाडी आहे. महायुतीमधून भाजपाच निवडणूक लढवत आहे. महायुतीचा कुठलाही प्रभाव आणि अस्तित्व दिसत नाही आहे. महायुती संपली आहे. भाजपाने शिंदे आणि अजित पवार यांना या निवडणुकीतून संपवलं आहे, असा दावा चेन्निथला यांनी केला.

पण महाविकास आघाडीमध्ये असं नाही आहे. आम्ही शिवसेना, राष्ट्रवादीसह छोट्या छोट्या पक्षांना  शक्य होईल तेवढं प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडीत असलेल्या सर्व घटक पक्षांना समान वागणूक देण्याचा प्रयत्न केला आहे. पण महायुतीच्या जागावाटपामध्ये भाजपाचं वर्चस्व दिसून येत आहे. उलट महाविकास आघाडी एकसाथ आहे. आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाही आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आमच्याकडून जे कुणी बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांचे अर्ज आणि उद्या मागे घेण्यात येतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. आम्ही केवळ हायकमांडने घोषित केलेल्या उमेदवारांनाच एबी फॉर्म दिला आहे. अन्य कुणाला एबी फॉर्म दिलेला नाही. काँग्रेसच्या हायकमांडने उमेदवारी जाहीर केलेल्या उमेदवारांचाच प्रचार करा, असं आवाहन मी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना करत आहे. त्याशिवाय ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले पाहिजेत. महाविकास आघाडीमध्ये कुठलीही मैत्रिपूर्ण लढत होणार नाही. जिथे कुठे मतभेद असतील ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि वर्षा गायकवाड सोडवण्याचे प्रयत्न करतील, असेही चेन्निथला यांनी सांगितले. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: Congress took a big decision regarding rebel candidates, Ramesh Chennithala made an important announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.