Maharashtra Assembly Election 2024 Vijay Wadettiwar News: एकीकडे भाजपाची उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असताना दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीत जागावाटपावरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात अद्यापही मतभेद कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विदर्भासह काही ठिकाणच्या जागांवर मतभेद असून, हळूहळू मतभेदांचे रुपांतर संघर्षात होऊ लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राजकीय घडामोडींना वेग येत असून, ठाकरे गटात आणि काँग्रेसमध्ये किंवा महाविकास आघाडीत नेमक्या किती जागांवरून वाद आहे, याबाबत एका नेत्याने थेट आकडा सांगत सविस्तर माहिती दिली.
महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत. आघाडी म्हणून आम्हाला लढायचे आहे. त्यामुळे काहीवेळेस थोडी बहुत नाराजी याला सामोरे जावेच लागते. जे काही नाराज कार्यकर्ते आहेत, त्यांची आम्ही समजावून सांगू. महाविकास आघाडी म्हणूनच महाराष्ट्रात निवडणुकीला सामोरे जाऊ, असा विश्वास काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. ते पत्रकारांशी बोलत होते.
महाविकास आघाडीतील १७ जागांवर अद्यापही तिढा कायम
महाविकास आघाडीचे तीनही पक्ष मिळून १७ जागांवर अद्याप तिढा आहे. यावर चर्चा होऊन लवकरच याबाबत निर्णय होऊ शकेल. जागावाटपासंदर्भात झालेल्या बैठका, त्यातील चर्चा तसेच कोणत्या भागातील किती जागा कुठल्या पक्षाला सुटल्या आहेत, याबाबत आम्ही राज्यातील नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, केसी वेणूगोपाल यांच्याशी चर्चा केली. आमच्या वाट्याला किती जागा आल्यात तसेच काही जागांवर जो पेच निर्माण झाला आहे, त्यावर काय मार्ग काढायचा, याबाबतही आम्ही चर्चा केली, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.
दरम्यान, विदर्भातील काही जागांवर वाद आहे, पण फार मोठा नाही. विदर्भातील ६ ते ७ जागांवर आमचा शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे गट यांच्यासोबत वाद आहे. याबाबतची चर्चा सकारात्मक झाली आहे. हा वाद, तिढा लवकरच संपेल, असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.