निकालाआधीच मविआत मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच; संजय राऊतांचा नाना पटोलेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 12:34 PM2024-11-21T12:34:47+5:302024-11-21T12:36:52+5:30
सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी आमचे सरकार कायम राहील असा विश्वास व्यक्त केला आहे तर विरोधकांनी लोकसभेसारखे विधानसभेतही महायुतीचं पानीपत होईल असा दावा केला आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं. गेल्या वेळच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी वाढली असून त्याचा फायदा कुणाला होणार हे निकालात स्पष्ट होईल. तत्पूर्वी बहुतांश एक्झिट पोलमध्ये महायुतीचे सरकार पुन्हा येईल असा कल दाखवण्यात आला आहे. मात्र महाविकास आघाडी १७०-१७५ जागा जिंकेल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. त्याचसोबत काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार बनेल असं विधान केल्यानं मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे असेल असे सूतोवाच केले आहे. मात्र पटोलेंच्या या विधानावर संजय राऊतांनी टोला लगावला.
संजय राऊत म्हणाले की, पुढील मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल हे मी मानत नाही. महाविकास आघाडीचं सरकार असेल आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. जर नाना पटोले असं म्हणत असतील, पटोलेंना जर हायकमांडने सांगितले असेल तुम्ही मुख्यमंत्री बनणार आहात तर राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर करायला हवं असा टोला त्यांनी लगावला.
पटोले-राऊतांचा वार-पलटवार
संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात पहिल्यांदाच असा वाद नाही. हरियाणात काँग्रेसच्या पराभवानंतर खासदार संजय राऊतांनी काँग्रेसवर तिखट प्रतिक्रिया दिली होती ज्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार पलटवार केला. महाविकास आघाडीतील जागावाटप, मुख्यमंत्रिपद यासारख्या विविध मुद्द्यांवरून अनेकदा राऊत-पटोले आमनेसामने आले आहे. त्यात आता विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतरही मुख्यमंत्रिपदावरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील वाद समोर येत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यंदा ६५ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी आमचे सरकार कायम राहील असा विश्वास व्यक्त केला आहे तर विरोधकांनी लोकसभेसारखे विधानसभेतही महायुतीचं पानीपत होईल असा दावा केला आहे. रात्री ११.३० च्या आकडेवारीनुसार राज्यात ६५.०२ टक्के मतदान झाले आहे. अद्याप अंतिम आकडेवारी आली नाही. त्यामुळे यात वाढ होण्याचीही शक्यता आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत आहे. भाजपा १४९, शिवसेना ८१ आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ५९ जागांवर निवडणूक लढवत आहे. तर काँग्रेस १०१, ठाकरे गट ९५ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ८६ जागांवर उमेदवार उतरवले होते. महायुती असो वा मविआ यांच्यात काही मतदारसंघात एकमेकांसमोर उमेदवार उतरवले आहेत. काही ठिकाणी बंडखोरी झाल्याचं दिसून आले. त्याशिवाय मनसे, वंचित आणि अपक्षांमुळे निकालात किती फरक पडतो हे २३ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे.