नाना पटोलेंनी तिकिट विकलं; माजी आमदारानं गंभीर आरोप करत भरला अपक्ष उमेदवारी अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 09:19 PM2024-10-29T21:19:09+5:302024-10-29T21:19:36+5:30
उमरखेड मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराविरोधात पक्षातच बंडखोरी, माजी आमदाराने अपक्ष उमेदवारी अर्ज भरला.
यवतमाळ - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर तिकिट विकल्याचा आरोप करत माजी आमदार विजय खडसे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमरखेड मतदारसंघातून विजय खडसे इच्छुक होते. मात्र याठिकाणी काँग्रेसनं साहेबराव कांबळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माजी आमदार नाराज झाले आहेत.
विजय खडसे यांनी म्हटलं की, मी पक्षाकडे तिकिट मागितले तेव्हा ज्याचं सर्व्हेत नाव येईल त्यांना उमेदवारी मिळेल असं नाना पटोलेंनी सांगितले, माझे नाव सर्व्हेत एक नंबरला असताना मला उमेदवारी नाकारण्यात आली. मला नाकारल्याचं दु:ख नाही परंतु या मतदारसंघात बाहेरचा उमेदवार पक्षाने दिला. स्थानिक उमेदवाराला डावलण्यात आले. जो उमेदवार पक्षाने दिला तो भ्रष्ट अधिकारी मोपलवार यांचा मानसपुत्र असलेल्या माणसाला दिली याची खंत आहे. बाहेरचा उमेदवार देण्यामागे काँग्रेसला संपवण्याचं षडयंत्र पटोलेंनी केलंय का अशी शंका आहे. २१ इच्छुकांनी उमेदवारी मागितली, परंतु स्थानिकांना डावलून मुंबईत राहणाऱ्या मोपलवारचं काम करणाऱ्या माणसाला ही उमेदवारी देण्यात आली असा आरोप त्यांनी केला.
तसेच खऱ्या अर्थाने हा काँग्रेसवर फार मोठा अन्याय आहे. अमरावती विभागात ५ मतदारसंघापैकी २ उबाठा, २ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला दिले. उमरखेड एकमेव मतदारसंघ असा काँग्रेसकडे होता जिथे १०० टक्के निवडून येण्याची संधी होती. परंतु स्थानिक इच्छुकांना डावलून बाहेर बाहेरच्या उमेदवारी दिली म्हणजे काँग्रेस विकली म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मी नाना पटोलेंना म्हणालो, सर्व्हेत मी नंबर एकला आहे. तरीही त्यांनी ऐकले नाही. जे सर्व्हेचे निकष लावले त्याचे पुढे झाले काय...? असा सवालही माजी आमदारांनी उपस्थित केला.
दरम्यान, राहुल गांधी यांनी लोकांमध्ये फिरून १० हजार किमी चालून जागरुक दिली. गांधी नेहरू यांच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम नाना पटोले करतायेत. अनेक ठिकाणच्या तक्रारी नानाभाऊंबद्दल आहे. काँग्रेस पक्षाशी प्रामाणिकपणे काम करणारे माझ्यासारखे लोक आहेत. हा अन्याय सहन करण्यापलीकडचा आहे. पक्षश्रेष्ठींनी याची दखल घ्यावी. माणिकराव ठाकरे यांचा हा मतदारसंघ ज्यांनी या राज्याचे नेतृत्व केले, संयमी, शांत माणुसकीचा माणूस. मात्र मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असणाऱ्या या माणसाला बाहेर काढण्यासाठी द्वारवा मतदारसंघ उबाठा देण्याचे काम केले. उमरखेड मतदारसंघ उबाठाला देऊन द्वारवा मतदारसंघ माणिकराव ठाकरे यांना दिला असता तर ते निवडून आले असते. नाना पटोलेंनी सुपारी घेऊन काँग्रेस संपवतायेत असा आरोप त्यांनी केला.
कोण आहेत विजय खडसे?
विजय खडसे हे २००९ साली उमरखेड मतदारसंघातून विजयी झाले होते. २०१४ साली भाजपाच्या राजेंद्र नजरधने यांनी त्यांचा पराभव केला. २०१९ मध्ये पुन्हा एकदा विजय खडसेंना काँग्रेसने उमेदवारी दिली. परंतु ९२७८ मतांनी खडसेंचा पराभव झाला.