शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या एक दिवस आधी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दीपक केसरकर यांनी ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. सावंतवाडीतून उमेदवारी न मिळाल्याने मागच्या काही दिवसांपासून नाराज असलेले ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा गावडे यांनी आज दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील आंबोली आणि आसपासच्या परिसरात बाळा गावडे यांची बऱ्यापैकी ताकद असल्याने ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहत असलेले चंद्रकांत उर्फ बाळा गावडे हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते. मात्र ठाकरे गटाने ऐनवेळी भाजपामधून आलेल्या राजन तेली यांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी दिली. त्यामुळे बाळा गावडे हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. तसेच ते महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाच्या प्रचारापासूनही अलिप्त होते. दरम्यान, आज त्यांनी सावंतवाडी येथे दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
या पक्षप्रवेशानंतर बाळा गावडे यांनी सांगितले की, मी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होतो. मात्र ऐनवेळी दुसरेच नाव पुढे करण्यात आले. मी पक्षाकडे माझी इच्छा बोलून दाखवली होती. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे मी राजीनामा देऊन घरी बसण्याचा निर्णय घेतला होता. मात्र माझ्या कार्यकर्त्यांनी मला शिंदे गटात प्रवेश करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे.