नागपूर - ऑल इंडिया उलेमा बोर्डचे प्रमुख सज्जाद नोमानी यांचा दुसरा व्हिडिओ जारी झालाय, त्यात भयंकर भाषा वापरण्यात आली आहे. काही मुस्लिम समाजातील लोकांनी लोकसभेला भाजपाला मतदान केले, त्यांना शोधून काढा आणि अशांवर सामाजिक बहिष्कार टाका असा संदेश त्यांनी दिला आहे. पुरोगामी म्हणवणारे लोक यावर एक शब्दही बोलत नाही असा गंभीर आरोप भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नागपूरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मतांसाठी विभाजन करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करतेय. तुम्हाला कुणालाही सामाजिक बहिष्कार टाकता येत नाही हा गुन्हा आहे. निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार देण्यात आली आहे. पंतप्रधान जे म्हणाले एक है तो सेफ है..आज काँग्रेस जातीजातीत विभाजन करण्याचा प्रयत्न करतेय. दुसरीकडे महाविकास आघाडी आणि काँग्रेस मिळून मुस्लिम समाजात धुव्रीकरण करून ते ही निवडणूक जिंकू इच्छितात. त्यांच्याकडे निवडणुकीसाठी मुद्दा उरला नाही. विकासावर बोलत नाही. रोडमॅप नाही. फक्त जातीवाद करून ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करतायेत असं त्यांनी सांगितले.
तसेच राज्यात महाविकास आघाडीकडून व्होट जिहाद सुरू आहे. सज्जाद मोमानी यांनी १७ मागण्या ३ पक्षांना दिल्यात. त्यात १० टक्के आरक्षण मुस्लिम समाजाला द्या, २०१२ ते २०२४ या काळात दंगलीतील मुस्लिमांचे खटले मागे घ्या, आरएसएसवर बंदी आणा अशाप्रकारच्या १७ मागण्या दिल्या. या पक्षांनी त्यांना पत्र देऊन या मागण्या आम्ही मान्य करू असं पत्र दिले आहे. सज्जाद नोमानी हे आता व्होट जिहादसाठी आवाहन करतायेत. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांना मते द्या. देशाच्या इतिहासात मतांसाठी इतके लांगुनचालन आम्ही कधी बघितले नव्हते असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.
दरम्यान, केवळ धुव्रीकरण करण्यासाठी अल्पसंख्याक मते मिळवण्यासाठी विरोधी पक्ष आणि महाविकास आघाडी काम करत असेल तर त्याविरोधात आपल्या सगळ्यांना एक व्हावेच लागेल. मूठभर मतांवर तुम्ही निवडून येऊ शकता असं वाटत असेल तर जे बहुसंख्य मते आहेत त्यांनाही विचार करावा लागेल. त्यांना एकत्र यावे लागेल असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.