महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याच दरम्यान आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या आपल्या पतीसाठी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. लाडक्या बहिणींना त्यांनी खास आवाहन केलं आहे.
लाडकी बहीण ही केवळ योजना नसून आपल्या सर्व बहिणींच्या आर्थिक सन्मानाला जपणारी भावाकडून बहिणीला दिलेली प्रेमाची ओवाळणी आहे असं सांगितलं आहे. तसेच "मला खात्री आहे की आपण बहिणी भावाच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभ्या राहू" असंही म्हटलं. अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करत खास पोस्ट केली आहे.
"माझी लाडकी बहीण’ ही केवळ योजना नसून आपल्या सर्व बहिणींच्या आर्थिक सन्मानाला जपणारी भावाकडून बहिणीला दिलेली प्रेमाची ओवाळणी आहे. राखी पौर्णिमेला मी महिला मेळाव्यात, शिक्षक सहकारी बँक सभागृहात यासंदर्भात आपल्याला आवाहन केलं होतं, भावाला कायम साथ देण्याचं आणि आता भाऊबीजेला देखील तेच सांगते की, सर्व लाडक्या बहिणींच्या प्रेमाचा ठेवा, मायेची थाप देवेंद्र फडणवीसजींच्या पाठीवर असू द्या. मला खात्री आहे की, आपण बहिणी भावाच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभ्या राहू!" असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातील नोंदीनुसार सद्यस्थितीत त्यांच्या एकट्याच्या नावावर सुमारे सव्वा पाच कोटींची संपत्ती आहे. मागील पाच वर्षांत उपमुख्यमंत्र्यांची संपत्ती ही २३ टक्क्यांनी वाढली आहे. प्रामुख्याने जमिनींच्या बाजारमूल्यात गेल्या ५ वर्षांत झालेल्या वाढीमुळे अचल संपत्तीत वाढ झाली आहे. २०१९ साली उपमुख्यमंत्र्यांकडे वैयक्तिकरीत्या ४५ लाख ९४ हजार ६३४ रुपयांची चल संपत्ती व ३ कोटी ७८ लाख २९ हजार रुपयांची अचल संपत्ती होती.