पुणे - राज्याच्या राजकारणात २०१९ नंतरचा राजकीय प्रयोग २०२४ च्या निकालानंतरही घडू शकतो का अशी कुजबुज सुरू झाली आहे. यामागचं कारण म्हणजे अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार किंगमेकर ठरतील. निकालानंतर काहीही घडू शकते असं विधान केले होते. परंतु आता पुन्हा एकदा अजित पवार गटाच्या एका नेत्याने केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पडद्यामागे सत्तेची समीकरण जुळवली जातायेत का असा प्रश्न पडला आहे.
राष्ट्रवादी नेते, मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, पुढचं काही सांगणे आता कठीण आहे. एका बाजूला आघाडी, दुसऱ्या बाजूला युती आहे. दोन्हीकडे ३-३ पक्ष आहेत. उद्या आघाडी सरकार येते की युती सरकार हे थोडावेळ बाजूला ठेवू, पण प्रत्येक पक्षाचे किती आमदार निवडून येतील हे पाहावे लागेल. त्यानंतर त्याचे खरे गणित जुळवले जाईल. त्यात कदाचित निवडणुकीच्या निकालानंतर काही समीकरणे बदलूही शकतात असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.
तसेच निकालानंतर बहुमताचं गणित जुळत नसेल तर सरकार आणण्यासाठी गणित जुळवावे लागेलच. काही ना काही करावे लागेल. ६ पक्ष आहेत. केवळ २-३ पक्ष नाहीत. त्यामुळे ६ पक्षांचं गणित जुळवण्यासाठी भरपूर वाव आहे असं सूचक विधान दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे. त्यामुळे २०२४ च्या निकालानंतरही अनेक समीकरण नव्याने उदयास येतील का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
नवाब मलिक काय म्हणाले होते?
२०१९ च्या निकालानंतर काय घडेल याचा अंदाज कुणी बांधला होता का, २०२४ च्या निकालानंतरही काही घडू शकते. अजित पवार किंगमेकर राहतील अशी खात्री आहे. मी जास्त भविष्यवाणी करू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला चांगल्या जागा मिळतील. आताच्या घडीला ही लढाई काटे की टक्कर अशी आहे. मोठा संघर्ष होणार आहे. सरकार कुणाचं येईल असा दावा कुणी करू शकत नाही. प्रचार जसजसा पुढे सरकत जाईल त्या परिस्थितीनुसार पुढे बघू असं असं विधान नवाब मलिकांनी केले होते.
त्याशिवाय विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाचेच सरकार येईल किंवा अजित पवार भाजपाबरोबरच असतील, हे आताच सांगणे कठीण आहे. या निकालानंतर कोण कोणाच्या बरोबर असेल हे सांगताच येत नाही. आता काही लोक सांगत आहेत की, एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांचे काही तरी चालले आहे. अशी वेगवेगळी चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे असा दावाही मलिकांनी केला होता.