राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर या निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सभा घेतल्या जात आहेत. दरम्यान, आम्ही १६५ ते १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचे काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी म्हटले आहे.
डीके शिवकुमार म्हणाले, "आम्ही १६५ ते १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार आहोत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार आहे. त्यांनी (भाजप) जनतेला भ्रमित केले आहे की, आम्ही आमची गॅरंटी लागू केली नाही. पण आम्ही जनतेला आश्वासन दिले होते. आम्ही पत्रकार परिषद घेतली आणि लोकांना समजले की आम्ही सर्व दिलेल्या गॅरंटी लागू केल्या आहेत."
पुढे डीके शिवकुमार म्हणाले, "संपूर्ण देश कर्नाटक मॉडेलचे अनुसरण करत आहे. मला खूप आनंद होत आहे की, किमान आता तरी महागाईचा देशातील सर्वसामान्यांवर परिणाम होत आहे, हे त्यांच्या लक्षात आले आहे." तसेच, वक्फच्या मुद्द्यावर ते म्हणाले, "भाजपच्या काळात सुरू झालेले सर्व रेकॉर्ड आमच्याकडे आहेत. मात्र, आमच्या मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, कोणत्याही शेतकऱ्याची जमीन घेतली जाणार नाही."
दरम्यान, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसंदर्भात वक्तव्य केले आहे. महाराष्ट्राचे सरकार हे चोरट्यांचे सरकार आहे. हे जनतेने निवडून दिलेले सरकार नाही, असे दिग्विजय सिंह म्हणाले. तसेच, ते म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारला निवडून दिले होते. झारखंडमध्येही भाजपने सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. कारण, नसतानाही त्यांनी झारखंडच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांना तुरुंगात पाठवले. त्यांना अटक का करण्यात आली, असा सवालही न्यायालयाने केला होता. तसेच, झारखंड आणि महाराष्ट्रात आमचे आघाडीचे सरकार स्थापन होईल, असा मला विश्वास आहे.