"सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सोयाबीन, कापूस आणि कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त’’, रमेश चेन्नीथला यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2024 06:25 AM2024-11-03T06:25:45+5:302024-11-03T06:26:39+5:30
Maharashtra Assembly Election 2024: केंद्र सरकारच्या चुकीच्या आणि व्यापारीधार्जिण्या आयात निर्यात धोरणामुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली.
मुंबई - भाजप शिंदे अजित पवारांच्या शेतकरी विरोधी आणि केंद्राच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे राज्यातील शेतकरी उद्धवस्त झाले आहेत. एकीकडे महागाई प्रचंड वाढली असून सोयाबीन,कापूस आणि कांदा या शेतीमालाला रास्त भावही मिळत नाही. शेतकरी, कष्टकरी, गृहिणी यांचे दिवाळं काढून शिंदे भाजपची दिवाळी सुरु आहे, अशी टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना रमेश चेन्नीथला यांनी केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या चुकीच्या आणि व्यापारीधार्जिण्या आयात निर्यात धोरणामुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. देशात सर्वात जास्त कापूस महाराष्ट्रात पिकतो पण सरकार ब्राझील आणि आफ्रिकेतून कापसाच्या गाठी आयात करते. त्यामुळे राज्यात कापसाचे भाव पडले आहेत आणि शेतक-यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. शेतक-यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे सीसीआय मार्फत सरकारने हमीभावाने कापूस खरेदी केली पाहिजे.
सोयाबीनची तिच अवस्था आहे. सोयाबीन तयार झाले आहे, पण त्याला भाव नाही. केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात पाम तेल आयात करत आहे, त्यामुळे सोयाबीनचे भाव पडले आहेत. पण दुसरीकडे सोयाबीनच्या तेलाचे भाव मात्र प्रचंड वाढले आहेत. आठवड्यापूर्वी १ हजार ६०० रुपयांना मिळणारा तेलाचा डबा आज २ हजार १५० रुपयांना झाला आहे. पण सोयाबीनला हमीभावही मिळत नाही. सरकारच्या या चुकीच्या धोरणांमुळे शेतक-यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.
कांदा पिकाच्या बाबतीत ही सरकारचे धोरण शेतक-यांसाठी मारकच आहे. महाराष्ट्रातील कांद्यावर निर्यातबंदी लावून गुजरात आणि कर्नाटकचा कांदा निर्यात केला जातो. निर्यात बंदी उठवली की निर्यात शुल्क वाढवून निर्यात बंद केली जाते. परदेशातून कांदा आयात करून देशात कांद्याचे भाव पाडले जातात. गुजरातचा २ हजार मेट्रिक टन कांदा निर्यात केला. पण महाराष्ट्रातील कांद्याला निर्यातबंदी केली. कर्नाटकच्या कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क हटवले आणि महाराष्ट्राच्या कांद्यावर लावले त्यामुळे महाराष्ट्रातील कांदा निर्यात ही केला जाऊ शकत नाही आणि त्याला भावही मिळत नाही. केंद्र सरकारचे आयात निर्यात धोरण हे महाराष्ट्र आणि राज्यातील शेतक-यांच्या विरोधात आहे. राज्यातला शेतकरी सुखी, समाधानी आणि समृद्ध करायचा असेल तर राज्यातील महायुतीने भ्रष्ट सरकार घालवून महाविकास आघाडीचे सरकार आणावे लागेल असे रमेश चेन्नीथला म्हणाले.